Thane crime News : ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली परिसरातील एका शेतजमिनीत उघड्या खड्यात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ३५ वर्षीय महिलेचा आणि सुमारे ३ वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. या दोघी मायलेकी असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्याबरोबरच त्यांचा मृत्यू कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही घटना मंगळवार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.२३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हि घटना ‘द इन्फिनिटी प्रोजेक्ट’ आणि विहंग व्हॅलीजवळील लेबर कॉलनी शेजारी असलेल्या शेतजमिनीत घडली. संबंधित जमीन मालकाचे नाव आशिष पाटील असून, या शेतजमीनमधील खड्डा सुमारे अडीच फूट खोल होता. या खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसून आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर कासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दल आणि शववाहिका घटनास्थळी दाखल झाली.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दल या पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह शववाहिकेमधून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करीत असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दोघी मायलेकी असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्याबरोबरच त्यांचा मृत्यू कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. गौरी गणपती विसर्जन धामधूम सुरु असतानाच हि घटना या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यात महिलेसह तीन वर्षीय बालिकेचा मृतांमध्ये समावेश असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.