ठाणे : उपनगरीय रेल्वेगाडीच्या दाराजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या व्यक्तीने प्रवाशाच्या हाताला चावा घेतला. हा सर्व प्रकार प्रथमवर्ग डब्यामध्ये घडला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डोंबिवली येथे ४८ वर्षीय जखमी प्रवासी राहतात. ते मुलुंडमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे.

शुक्रवारी सकाळी त्यांनी कामाला जाण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून रेल्वेगाडीने प्रथम वर्ग डब्यातून प्रवास सुरु केला. प्रवासा दरम्यान ते रेल्वेगाडीच्या दाराजवळ उभे होते. रेल्वेगाडी कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एक प्रवासी त्या रेल्वेगाडीत शिरला. तो प्रवासी त्यांच्या समोरच उभा राहिल्याने त्यांनी त्याला आतमध्ये जाण्याची विनंती केली. परंतु त्या प्रवाशाने मी आत जाणार नाही असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या व्यक्तीने डोंबिवलीच्या प्रवाशाच्या हाताला जोरदार चावा घेतला. त्यानंतर ते दोघेही मुलुंड स्थानकात उतरले. तिथेही त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. त्या प्रवाशाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील ब्रेसलेटने त्यांच्या डोळ्याजवळ आणि डोक्यावर मारले.

दरम्यान, घटनेची माहिती मुलुंड रेल्वे स्थानकातील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. जखमी कर्मचाऱ्यावर रेल्वे स्थानकातील स्थानक व्यवस्थापकाच्या कक्षामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. दोन्ही प्रवाशांना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे जखमी प्रवाशाने तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.