ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून भामट्यांनी ठाण्यातील दोघांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पहिल्या प्रकरणात फसवणूक झालेले व्यक्ती एका नामांकित कंंपनीतील सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना शेअर बाजारात पैसे गुंतवायचे होते. त्यासंदर्भाची एक जाहिरात त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाली. त्यांनी त्यावर क्लिक केले असता, त्यांनी एका व्हाॅट्सॲप समूहात प्रवेश केला. त्यामध्ये गुंतवणूकीबाबत चर्चा होत होती. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने टप्प्या-टप्प्याने ३४ लाख ६२ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यांना परतावा मिळाला नाही. परताव्या बाबत विचारणा केली असता, कर भरावा लागेल असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. त्याआधारे, राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा…बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी उल्हास नदीतून आरक्षण मंजूर, योजना मार्गी लागणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरे प्रकरण नौपाडा येथील गोखले रोड भागातील आहे. फसवणूक झालेली महिला २९ वर्षीय आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम या समाजमाध्यम पाहत होत्या. त्यावेळी त्यांना ‘घरबसल्या काम’अशी एक जाहिरात निदर्शनास आली. त्या जाहिरातीवर महिलेने क्लिक केले असता, तिला शेअर बाजारातील काही टास्क आणि माहिती दिली जाईल. ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, अशा आशयाचा संदेश प्राप्त झाला. काहीवेळाने टेलेग्राम या समाजमाध्यमावर त्यांना काही चित्रीकरण प्राप्त झाले. त्यामध्ये गुंतवणूकीची माहिती देण्यात आली होती. महिलेने एक हजार रुपये गुंतविल्यानंतर त्यांना काहीवेळाने परतावा म्हणून १ हजार ३०० रुपये प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी १ हजार ९९८ रुपये गुंंतविले असता, त्यांना ३ हजार ८९७ रुपये प्राप्त झाले. त्यामुळे महिलेला विश्वास बसला. त्यांनी १४ ते १५ सप्टेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्याने तिने नातेवाईकांचे २२ लाख ९ हजार ९९७ रुपये गुंतविले. महिलेने परताव्या बाबत विचारले असता, तिला कर भरावा लागेल असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.