ठाणे : शहरातील कोपरी पुलाजवळील नाशिक-मुंबई मार्गावर एका ट्रक चालकाच्या धडकेत झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या अपघाताची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.

अपघातात मृत झालेली व्यक्ती ठाण्यातील नितीन कंपनी भागात राहत असल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्ती कामानिमित्त दुचाकीने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची दुचाकी कोपरी पुलाजवळ येताच नाशिक मुंबुई महामार्गावर येताच गुजरातहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. या अपघातात या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, नौपाडा पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून पुढील कार्यवाहीकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय पाठविला. परंतू, या दुचाकी चालकाने वाहन चालवत असताना शिरस्त्राण परिधान केले नसल्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. या अपघातामुळे सुमारे अर्धा तास या वाहिनीवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला असल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.