Eknath Shinde, ShivSena नवी मुंबई : आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, पण दादागिरी करुन आमच्या खात्यामध्ये जर कोण हस्तक्षेप करत असेल तर, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी नवी मुंबईत बोलताना दिला. नवी मुंबईतील वाशी येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि अंकुश कदम यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात उदय सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

“नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामांची यादी माझ्याकडे आहे. नवी मुंबईत खऱ्या अर्थाने लोकांना जीवदान देण्याचे काम जर कोणी केले असेल, तर ते शिंदे यांनी केले आहे. त्यांच्यामुळे माथाडी कामगार असतील, सर्वसामान्य झोपड्यांमध्ये राहणारे किंवा भविष्यात एसआरएमध्ये जाणारे लोक असतील. सर्वांना न्याय मिळवून देण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. म्हणूनच नवी मुंबईकरांचा विश्वास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, दुसऱ्या कोणावर नाही,” असे उदय सामंत यांनी म्हटले.

या मेळाव्याला बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण काही लोकांचा नाहक त्रास या सर्वांना होत आहे, अशा लोकांची वाट या सर्वांना लावायची आहे. यासाठी या कार्येकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मोकळे सोडले पाहिजे. कधी कधी प्रवक्त्यांपेक्षा आपल्या शाखाप्रमुखांना अशा लोकांवर बोलण्याची संधी दिली पाहिजे. कारण, काही मंडळींवर बोलण्याची प्रवक्त्यांची देखील इच्छा नसते त्यांना शाखाप्रमुखानेचं बोलले पाहिजे असे मत उदय सामंत यांनी यावेळी मांडले.

“आपल्या नेत्याचा झालेला अपमान हा कार्यकर्त्याच्या जीवाला लागत असतो. कदाचित तो कार्यकर्ता बोलत नसेल, तुमच्यासमोर येत नसेल, पण मी कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो, याचे उत्तर नवी मुंबई महानगरपालिकेत दिल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. हा संकल्प करण्याचा आणि शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे. पण, काही लोकांना असे वाटते की काही भाग हे त्यांची मक्तेदारी आहे. मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकच विनंती करतो, जर तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलात, तर आपला भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकवू शकतो. एवढी ताकद या कामांमध्ये आहे,” असे आवाहन उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना केले.

“महानगरपालिका आपण जिंकत असताना किंवा निवडणूक लढत असताना, आपल्या कारणामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना त्रास होणार नाही, तसेच त्यांचे लक्ष फक्त नवी मुंबईवर राहणार नाही, ही जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वीकारली पाहिजे. साहेबांना सांगितले पाहिजे. ‘साहेब, महाराष्ट्रात काम करा, महाराष्ट्रात प्रचाराला जा. नवीमुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक म्हणून आमची आहे.’ हा शपथपूर्वक शब्द आपण सर्वांनी शिंदे यांना दिला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की, शिंदे २० ते २२ तास काम करतात. आपण स्वतः जवळून पाहताय की जेव्हा ते २०-२२ तास काम करतात, तेव्हा त्यांचे असे कधी म्हणणे नसते की, ‘माझ्यासारखेच तुम्हीही २० तास काम करा.’ पण आपण दिवसाला दोन तास जरी प्रामाणिकपणे काम केले, तरी शिंदेंना अपेक्षित असलेली शिवसेना आणि तिचा झंझावात नवी मुंबईत उभा राहू शकतो. आणि तो उभा करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावे,” अशी विनंती उदय सामंत यांनी यावेळी सर्वांना केली.