ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक जागा जिंकत तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. आता येत्या काही महिन्यात, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज, शनिवारी ठाण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आज, शनिवारी आठवणीतले अनंत तरे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. स्व. अनंत तरे यांच्या जीवन चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्यातून कोळी समाजाचे पदाधिकारी, आगरी बांधव, एकविरा देवी भाविक व ठाणेकर रसिक उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात वाद रंगला होता.
याच दरम्यान, शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना अनंत तरे यांचा उल्लेख केला होता. त्यावरून तरे कुटुंबिय आणि समर्थकांनी संताप व्यक्त केला होता. या वादावर उद्धव ठाकरे काही बोलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, येत्या काही महिन्यात, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांबाबत ते कार्यकर्त्यांना काही संदेश देणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे शहराचे त्रिविक्रमी माजी महापौर, माजी आमदार तथा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे संस्थापक, कार्ला एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष, शिवसेना उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या यशस्वी जीवनावर आधारीत अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे पुस्तकाचे प्रकाशन आज होणार आहे. हा कार्यक्रम दोस्ती फाऊंडेशन व अनंत तरे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. अनंत तरे पुस्तकाचे लेखन त्यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोळी यांनी लिहीले असून दोस्ती पब्लिकेशनच्या माध्यमातुन चरित्र पुस्तक प्रकाशित होत आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणुन माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे, व्यवसायिक नंदकुमार साळवी, अनंत तरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दक्षता अनंत तरे, खजिनदार डॉ. जस्मिन राजके-तरे, पायलट विशाल तरे, मदन भोई, दिलीप जयसिंगपुरे, नवनाथ देशमुख हे आहेत.
गणेश नाईक उपस्थित राहणार
कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. कवी लेखक अरुण म्हात्रे, अभिनेते उदय सबनिस, मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य जयु भाटकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, धाराशिवचे खासदार ओमराजे निबांळकर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोळी समाजाचे नेते माजी आमदार रमेश पाटील, आगरी समाजाचे नेते अतुल दि.बा. पाटील, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, आणि इतर उपस्थित राहणार आहेत.