बदलापूरमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये वळवणार

गेल्या कित्येक वर्षांपासून बदलापूर शहरातील सांडपाणी थेट पात्रात सोडण्यात येत असल्याने प्रदूषित होत चाललेल्या उल्हास नदीचा ऱ्हास येत्या काळात थांबण्याची चिन्हे आहेत. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खरडपट्टी काढल्यानंतर अखेर नगरपालिकेला शहाणपण सुचले आहे. अमृत अभियानांतर्गत ७० कोटींचा खर्च करून नगरपालिका सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या व प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

बदलापूर शहराचे सांडपाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी उल्हास नदीपात्रात सोडण्यात येते. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नसलेला भुयारी गटार प्रकल्प कोटय़वधींचे पैसे खर्चूनही अपूर्ण आहे. त्यात २२ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्यात आले आहे. मात्र शहरातील भुयारी गटार वाहिन्यांना रहिवासी सांडपाण्याच्या वाहिनी जोडल्या गेल्या नसल्याने अवघे पाच एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. जोडण्या पूर्ण न झाल्याने आजही विविध नाल्यातून उल्हास नदी पात्रात सांडपाणी जाऊन प्रदूषण होते आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुळगांव बदलापूर नगरपालिकेला नोटीस पाठवली होती. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देऊन पालिकेने वेळ मारून नेली. मात्र अद्यापही सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. मात्र, येत्या काळात ही पद्धत बंद होण्याची शक्यता आहे. अमृत अभियानांतर्गत बदलापूर नगरपालिकेला अतिरिक्त ७० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या योजनेनुसार उल्हास नदीपात्रात जाणारे सांडपाणी मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे तसेच अन्य दोन छोटय़ा प्रक्रिया केंद्रांकडे वळवले जाणार आहे. हे सांडपाणी थेट नदीत जाऊ नये, यासाठी सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली. हे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून घरांच्या जोडण्या पूर्ण झाल्यानंतर नदीत जाणाऱ्या सांडपाण्यावरही नियंत्रण मिळवता येणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.