किशोर कोकणे लोकसत्ता
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि मिरा भाईंदर या शहरांमध्ये सूक्ष्म धुळीकणांचे प्रमाण अधिक असून ही दोन्ही शहरे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदुषित असल्याचा अहवाल ‘रेस्पायरर लिविंग सायन्सेस’ या संस्थेच्या पहाणीत समोर आला आहे. या संस्थेने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील महत्वाच्या परिसरातील हवेची पडताळणी केली होती. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या अहवालात कल्याण शहरातील हवेची गुणवत्ता जिल्ह्यातील सर्वात समाधानकारक आहे, असे निरीक्षण नोंदिवण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मीरा भाईदर महापालिकेने शहरातील हवा मुंबईच्या तुलनेत उत्तम असल्याचा दावा केला होता.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई वगळता इतर भागात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाची उपकरणांची संख्याही कमी असल्याची बाब या संस्थेच्या पहाणीत समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील हवेच्या गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंबंधी गंभीर दखल घेऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळे निर्बंध अंमलात आणण्याच्या सूचना स्थानिक स्वज्ज्य संस्थांना दिल्या आहेत. ठाणे जिल्हा मुंबई शहरापासून सर्वांत जवळचा जिल्हा आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील हवेच प्रदूषण गेल्या काही वर्षात काही पटींनी वाढले आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकाम, वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे, अवैध पद्धतीने उभी रहाणारी बांधकामे, राडारोड्याची अवैध वाहतूक तसेच काही कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे हे प्रदुषण सतत वाढताना दिसत आहे.
ठाणे पल्याडची शहरेही प्रदुषित
रेस्पायरर लिविंग सायन्सेस या संस्थेने ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मिरा भाईंदर, उल्हासनगर, बदलापूर आणि भिवंडी या शहरातील पीएम २.५ स्तराच्या (अतिसुक्ष्म धुळीकण) हवेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार केला आहे. यासाठी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता मोजणी यंत्राद्वारे माहिती घेण्यात आली. या अहवालामध्ये उल्हासनगर शहरात सर्वाधिक अतिसूक्ष्म धुळीकण आढळून आले. उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या कालावधीत पीएम २.५ चे स्तर सरासरी प्रमाण १०५.३ (मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) इतके होता. तर मिरा भाईंदर शहरात ही पीएम २.५ चे प्रमाण सरासरी प्रमाण ९३.६ (मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) इतके होते. हे प्रमाण वाईट पातळीचे आहे. तर ६ नोव्हेंबरला उल्हासनगरमधील हवा अतिशय वाईट पातळीवर होती. या दोन्ही शहरानंतर बदलापूर शहराचा क्रमांक लागतो. बदलापूर शहरात पीएम २.५ चा स्तर सरसरी ९१ इतका होता.
आणखी वाचा-मराठा आरक्षणाचे प्रतिबिंब दिवाळीच्या कंदिलावरही
हा अहवाल तयार करताना एक गंभीर बाब आढळून आली. नवी मुंबई आणि ठाणे या दोन शहरात हवेची गुणवत्ता तपासण्याची प्रत्येकी दोन यंत्र कार्यान्वित होते. तर उर्वरित शहरात केवळ एक यंत्रावर हवेची गुणवत्ता मोजली जात आहे. दुसरीकडे मुंबई शहरात तब्बल २० यंत्र कार्यान्वित आहेत. त्यामुळे मुंबई पासून जवळचा जिल्हा असतानाही ठाणे जिल्ह्यात तुलनेने कमी यंत्रणा कार्यान्वित असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
ठाणे जिल्ह्याची हवा धुळीकणांमुळे प्रदुषित झाली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन शासकीय यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा नियम कागदावर राहतील. -रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.
शहरे | हवेची गुणवत्ता निर्देशनांक-पीएम २.५ (३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर सरासरी) |
उल्हासनगर | १०५.३ (वाईट) |
मिराभाईंदर | ९३.६ (वाईट) |
बदलापूर | ९१.० (वाईट) |
भिवंडी | ८१.०६ (मध्यम प्रदुषित) |
नवी मुंबई | ८०.०१ (मध्यम प्रदुषित ) |
ठाणे | ५८.० (समाधानकारक) |
कल्याण | ५४.०६ (समाधानकारक) |
पीएम २.५ नेमके काय आहे?
हवेत पीएम २.५ हे प्रमाण पीएम १० पेक्षा अतिघातक आहे. हे कण श्वास घेताना सहज नाक आणि तोंडावाटे शरिरात प्रवेश करतात. हे धुळीकण हृदयविकाराचा झटका, दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या निर्माण करते. बांधकाम क्षेत्राचे ठिकाण, रस्त्यावरील धूळ, झिझेल वाहन, कारखान्यांतील उत्सर्जन यामुळे हे प्रदुषण होते.