उल्हासनगरः उल्हासनगर शहरात आपले वर्चस्व राखून असलेल्या टीम ओमी कलानीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन वेळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीम ओमी कलानी यांची भेट घेतली असून शिंदेंसाठी कलानींनी दोन कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन केले होते. तर एकदा घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाशी जवळीक असूनही यंदाही कलानी श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारात उतरणार आहेत.

राजकीय युती – आघाड्यांना तिलांजली देत अनेकदा उल्हासनगर शहरात विचित्र राजकीय समिकरणे तयार झाल्याचे दिसून आले आहे. २०१७च्या पालिका निवडणुकांपर्यंत शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती शहरात होती. २०१७ नंतर भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला दूर करत टीम ओमी कलानीशी आघाडी केली होती. शहरात ओमी कलानी यांची वेगळी ताकद आहे. त्यांच्याशिवाय सत्तेचे समीकरण गाठणे शक्य होत नसल्याचेही बोलले जाते.

हेही वाचा – डोंबिवलीत पालिका साहाय्यक आयुक्ताबरोबर सफाई कामगाराची अरेरावी

२०१७ वर्षात ओमी कलानी यांनी आपले उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा महापौर उल्हासनगर पालिकेत निवडून आला होता. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेने टीम ओमी कलानीला आपल्याकडे वळवत पालिकेची सत्ता मिळवली होती. त्यानंतर शिवसेना भाजपात दुरावा होता. मात्र ओमी कलानीशी शिवसेनेचे चांगले संबंध होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर कलानी यांचा कल शरद पवार यांच्या गटाकडे होता. शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी महल येथे जात कलानी कुटुंबाची भेटही घेतली होती. त्यामुळे कलानी गट शरद पवार गटाकडे झुकणार याची दाट शक्यता होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कलानी कुटुंबाने शिवसेनेला उघड पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संपूर्ण मतदारसंघ प्रचार करताना पिंजून काढत आहेत. या भेटीगाठींमध्ये कलानी गटाचे पदाधिकारीही हजेरी लावत आहेत. तर कलानी गटाने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दोन कार्यकर्ते मेळावे आयोजित केले होते. मंगळवारी कलानी महलात पुन्हा टीम ओमी कलानींच्या वतीने आयोजीत संघटना बैठकीला श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांनी कलानी टीमचे आभार मानले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

हेही वाचा – ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलानी आणि शिवसेनेची मैत्री फार जुनी असून यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला बिनशर्त मोठी मदत केल्याचे शिंदे यांनी सांगितले. टीम ओमी कलानीची उल्हासनगरमध्ये वेगळी ताकद असून ओमी कलानी एक उत्तम मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाशी जवळीक असली तरी टीम ओमी कलानी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आहे.