उल्हासनगर: उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था अपघातांना आमंत्रण देत असताना रविवारी कल्याण-बदलापूर या वर्दळीच्या मार्गावर खड्ड्यांमुळे एक दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडले. या दाम्पत्यासोबत त्यांचे लहान बाळही होते, परंतु सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये पालिकेविरोधात नाराजी पसरली आहे. यापूर्वीही पालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून अनेक अपघात झाले आहेत. त्यात दोघांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.

मागील दोन वर्षांपासून उल्हासनगरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते भुयारी गटार आणि इतर कामांसाठी खणले गेले आहेत. यामुळे खोदलेले खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे गेल्या वर्षभरात अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडले. याविरोधात नागरिकांनी मोर्चे आणि आंदोलने करूनही पालिकेने खड्डे बुजवणे किंवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे लक्ष दिलेले नाही. रविवारी १७ सेक्शन परिसरातील कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर एक दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना सिमेंट रस्ता आणि कडेच्या खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी घसरुन पडली. ज्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. मागे बसलेल्या महिलेच्या हातात त्यांचे लहान बाळ होते, पण दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली असून, वाहनचालकांनी शहरातील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी अशाच घटना

उल्हासनगर शहरात काही महिन्यांपूर्वी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर खड्ड्यामुळे अपघातग्रस्त होऊन मृत्युमुखी पडले. त्यानंतर एका विकास कामात झालेल्या खोदकामात पडून एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी खोदलेले रस्ते आणि रस्ते कामात विविध ठिकाणी विविध घटनांमध्ये डझनभर व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकात संतापाचे वातावरण आहे.