लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण, भिवंडीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कल्याणमध्ये येत आहेत. यानिमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव मागील पाच दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत कल्याणमधील अनेक व्यावसायिकांचे रस्त्यावरील व्यवसाय पालिकेने जमीनदोस्त केले. सभेसाठी नरेंद्र मोदी येणाऱ्या रस्त्यांवरील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण शहरात येणारे सर्व मुख्य वर्दळीचे रस्ते अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. या अघोषित बंदीने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मोदी कल्याण जवळील भिवंडी हद्दीतील बापगाव येथील हेलिपॅडवर बुधवारी उतरणार आहेत. हेलिपॅड ते कल्याण पश्चिमेतील वर्टेक्स मैदान, आधारवाडी सभा स्थळ दरम्यानच्या रस्ता सुस्थितीत, मोकळा असावा म्हणून या रस्त्या दुतर्फा स्थानिक ग्रामस्थ, तरूणांनी काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या भाजीपाला विक्री, ढाबे, वडापाव, मिसळ विक्रीचे व्यवसाय सुरू केलेले सर्व व्यवसाय मोदींच्या विशेष सुरक्षा पथकाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिकेने जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या रस्त्यालगतीची पक्की दुकाने हिरव्या जाळ्या लावून बंदिस्त केली आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र, केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन

डोंबिवली एमआयडीसी, भिवंडीतील सरवली एमआयडीसीत कच्चा आणि पक्का माल घेऊन जाण्यासाठी परराज्यातील अवजड वाहने कल्याण, भिवंडी शहरांच्या वेशीवर मंगळवारपासून थांबली आहेत. त्यांना शहरात प्रवेश नसल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण शहरात येणारे नेवाळी नाका, म्हारळ, शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण, पडघा-कल्याण रस्ता येथील मुख्य रस्ते अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. सर्व अवजड मालवाहू वाहने गावांमधील पर्यायी रस्त्याने इच्छित स्थळी जात आहेत. पडघा-गांधारी पूल मार्गे-कल्याण हा भिवंडी, वाडा, शहापूर भागातील नागरिकांचा सर्वाधिक जवळचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर बापगाव येथे नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या हेलिपॅडच्या सुरक्षितेसाठी बुधवारी सकाळी सात वाजल्या पासून पडघा ते कल्याण रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला आहे. त्यामुळे सापे, बापगाव, आमणे परिसरातील नोकरदार, व्यावसायिकांचे सर्वाधिक हाल झाले. ही मंडळी बुधवारी पहाटेच सुरक्षेचा अडथळा नको म्हणून घरातून कामावर निघाली.

आणखी वाचा-बेकायदा ९० फलकांकडे डोळेझाक, संरचनात्मक परिक्षण अहवाल तपासणी यंत्रणेविना; ठाणे महापालिकेचा कारभार

एका सभेसाठी कल्याण परिसरातील नागरिकांना सुरक्षा व्यवस्थेने वेठीस धरल्याने सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हेलिपॅड ते सभास्थळीच्या रस्त्यावर पालिकेने सीसीटीव्ही लावून दिले आहेत. काही ठेकेदारांनी या कामाचे देयक कोण देणार या विषयावरून काम करण्यास माघार घेतली असल्याचे समजते. सभा मंडप ठेकेदाराला सुरक्षा व्यवस्थेने बेजार केल्याची माहिती आहे. मोदींच्या सभा मंडपापासून ५०० मीटर परिसर वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्त्यांचा वापर वाढल्याने कल्याणमध्ये जागोजागी वाहन कोंडी, प्रवासी सभेमुळे हैराण आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून नागरिकांना घेऊन येणाऱ्या सुमारे दोनशे हून अधिक बस, खासगी वाहने एकावेळी कल्याण परिसरात येणार असल्याने अनेक उद्योजक, व्यावसायिक, जाणत्या नागरिकांनी घराबाहेर पडणे थांबवले आहे.