नायगाव स्थानकाजवळ खारफुटींवर मातीचा भराव टाकून दुचाकींचे वाहनतळ

तिवरांची कत्तल करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी वसई-विरार परिसरात सर्रास तिवरांची कत्तल केली जाते. नायगाव स्थानक परिसरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तिवरांच्या झाडांवर मातीचा भरणा करण्यात आला असून तिथे आता दुचाकीस्वरांकडून अनधिकृत पार्किंग करण्यात आले आहे.

तिवर क्षेत्रापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत नायगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात तिवरांची कत्तल केली जात आहे. नायगाव पश्चिमेकडे स्थानक परिसरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या  तिवरांच्या झाडांवर अज्ञात व्यक्तीमार्फत मातीचा भरणा करण्यात आला आहे. हा भरणा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. भरणा केल्याने रस्त्याची रूंदी वाढली असून त्याजागी दुचाकीस्वार अनधिकृतपणे पार्किंग करत असल्याचे दिसून आले आहे.

कारवाई करण्याची मागणी

नायगाव येथे सध्या तिवरांची कत्तल करून भरणा करण्यात येण्याच्या घटनांत वाढ होत चालली आहे. या आधीदेखील नायगाव पश्चिमेकडील भागात खाडीकिनारी तिवरांच्या झाडांवर मातीचा भराव टाकण्यात आला असून तिवरांची मोठय़ा प्रमाणात कत्तलही करण्यात आली आहे. याबाबत वसई तहसीलदारांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने त्यामुळे तिवरांवर भरणा केलेल्यावर कारवाई करण्यात यावी तसेच या बेकायदा पार्किंग केलेल्या गाडय़ा येथून हटवाव्यात  अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

तिवरांच्या झाडांवर मातीचा भरणा कुणी केला याची चौकशी करण्यात येत आहे. लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येईल.

– गजेंद्र पाटोळे, तहसीलदार, वसई