‘‘मीकॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. मुंब्रा येथे एक इमारत पत्त्यासारखी कोसळून ५०-६० माणसं मृत्युमुखी पडल्याची बातमी चर्चेत होती. मित्राबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फेरफटका मारत असताना ही बातमी जणू जिवंत झालेली बघायला मिळाली. सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या मृत शरीरांचे हे भीषण दृश्य बघून क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझं मनच मेलं, पूर्णपणे संवेदनाशून्य झालं, जणू पुढे जाऊन मृत शरीर शोधून काढण्याचं काम माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पडावं, यासाठी नियतीनं टाकलेला तो डावच होता’’, हाती घेतलेल्या कामासाठी तयार झालेल्या ‘मनाच्या’ पाश्र्वभूमीची माहिती, ठाणे स्कूबा डायव्हिंग क्लब या १९८३ मध्ये स्थापन झालेल्या स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या, देशातील एकमेव खासगी क्लबचे सर्वेसर्वा विजय पटवर्धन देत होते.
लहानपणापासून त्यांना पाण्याची ओढ, त्यामुळे फक्त ‘वरवर’ पोहण्याचा आनंद न घेता ‘खोलखोल’ जाण्यासाठी ते त्यांचे गुरू डॉ. सापटनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूबा डायव्हिंग शिकले. पाण्याचा तळ गाठण्यामध्ये येणारे संभाव्य धोके विचारात घेऊन पोलीस दल, अग्निशामक दल व आपत्कालीन व्यवस्था कक्ष यांच्या हाकेला ‘ओ’ देण्यासाठी डॉ. सापटनेकर यांच्याबरोबर त्यांची युती झाली. बायर कंपनीतील आपली नोकरी सांभाळून पाण्यात पडलेल्या मौल्यवान वस्तू, दडवलेली स्फोटके, मृत शरीरे पाण्याबाहेर काढणे, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्यांची सुटका करणे असा वेगळ्या वाटेवरचा प्रवास चालू झाला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून डॉ. विश्वास सापटनेकर, विजय पटवर्धन, एन. जी. ऊर्फ नाना पटवर्धन, महेश राजदेरकर यांनी एकत्रितपणे ठाणे स्कूबा डायव्हिंग क्लबची ऑक्टोबर १९८३ मध्ये मुहूर्तमेढ रोवली. भारतात प्रशिक्षित स्कूबा डायव्हर्स नसल्यामुळे परदेशातून अशी सेवा घेण्यासाठी खर्च होणारे परकीय चलन वाचवावे हा त्यामागचा एक दृष्टिकोन. शिवाय कुठलेही ‘अर्थ’कारण मनात न ठेवता तरुणाईला स्कूबा डायव्हिंग हा थरारक छंद, व्यवसाय म्हणून करता यावा, यासाठी आवश्यक ते कौशल्य, खाचाखोचा शिकवून, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम करावे, हाही उद्देश. जनसेवा आणि देशसेवा हे क्लबचे धोरण बघून ठाणे म्युनिसिपल कमिशनर श्रीनिवास सोहनी यांनी मारोतराव शिंदे तरणतलाव आठवडय़ाला एक तास विनाशुल्क उपलब्ध करून दिल्यामुळे क्लब खऱ्या अर्थाने सुरू झाला. हवेचा सिलिंडर व इतर उपकरणे असा अडीच लाखांचा संच तयार ठेवून आपल्याच पोटाला चिमटा देत ‘मान’ ‘धन’ किंवा कौतुकाचा एखादा शब्द याची यत्किंचितही अपेक्षा न ठेवता पटवर्धन यांचे काम सुरू झाले.
नेव्हीत जायला न मिळाल्यामुळे हुकलेली देशसेवेची संधी २ एप्रिल १९९३ साली विजय पटवर्धन यांना अचानक मिळाली. पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून नागला बंदरात दडवलेला स्फोटकांचा साठा खाडीतून बाहेर काढण्यासाठी जिवावर उदार होऊन डॉ. सापटनेकर यांच्यासह त्यांना जावे लागले. ४५ फूट पाण्याखाली संपूर्ण दलदलीतून २६८० किलो फऊ ची पोती वर काढणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. केवळ देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून वाघाच्या जबडय़ातून ते जेव्हा बाहेर आले तेव्हा संपूर्ण काळेकुट्ट होऊन चिखलाने बरबटून गेले होते. पोलीस कमिशनर यांच्या मते ठाणे, मुंबई, नवी मुंबई बेचिराख करण्याचा कट केवळ त्यांच्या धाडसी, बेडर वृत्तीमुळे उधळला गेला, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पदच आहे. त्याबद्दल त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच. ‘आपल्या मुलाने केवळ आपलाच नाही तर ४२ पिढय़ांचा उद्धार केला आहे’ अशी भावना त्यांच्या वडिलांनी (नानांनी) त्याक्षणी व्यक्त केली होती. या शौर्याची दखल घेऊन अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांनी शेरवुड स्कूबा डायव्हिंग सेट त्यांना भेट दिला.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने १९९१ पासून २००५ पर्यंत गणपती विसर्जनाच्या वेळी दहा दिवस स्वत:चा जीव धोक्यात घालून ‘जीवन रक्षका’ची भूमिका घेत अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. २००६मध्ये विजय पटवर्धन यांनी स्पेन येथील अभ्यासक्रम दहा-वीस लाख रुपये खर्च करून पुरा केला आहे. या संस्थेचे इन्स्ट्रक्टर, ट्रेनर, इव्हॅल्युएटर हे भारतातील अत्युच्च प्रमाणपत्र तसेच त्यांचे भारतातील प्रतिनिधी म्हणून भारतात स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणे, प्रशिक्षक तयार करणे आणि नवीन स्कूबा डायव्हिंग केंद्र स्थापन करणे हे अधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत. याच भूमिकेतून ठा.म.पा.ने पोलीस, अग्निशामक दल व आपत्कालीन व्यवस्था या खात्यातील कर्मचाऱ्यांना स्कूबा डायव्हिंग शिकवावे, देशातील स्कूबा डायव्हिंग पथक असलेली पहिली म.पा. म्हणून स्थान मिळवावे, त्यासाठी प्रशिक्षणाची जबाबदारी मी घेईन, अशा आशयाचे पत्र २०१० मध्ये विजय पटवर्धन यांनी अत्यंत पोटतिडकीने पाठवले होते. दाताच्या कण्या केल्या, परंतु आजतागायत त्या पत्राची कोणीही दखल घेतलेली नाही, याचे पटवर्धन यांना वैषम्य वाटते.
या सेवाकार्यात त्यांचा मुलगा कमलेश तसेच साहाय्यक मल्हार कुलकर्णी, उपेंद्र झगडे, रोहन खर्डीकर त्यांना मदत करत आहेत. सातत्याने येणाऱ्या निसर्ग प्रकोपांमध्ये स्कूबा डायव्हिंगची आवश्यकता लक्षात घेऊन जनतेच्या रेटय़ामुळे उत्तराखंड या राज्याने मात्र मनावर घेतले. त्यामुळे ठाणे डायव्हिंग क्लबने तेथील पोलीस दलातील ५० कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन प्रशिक्षित केले असून, स्कूबा डायव्हिंग पथक असलेले उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. आज उत्तराखंड पोलिसांनी संकटकाळी शोधकार्य उत्तम प्रकारे चालू केले आहे. याचा विजय पटवर्धन व कमलेश यांना अभिमान व समाधान वाटते. कोणतेही सुरक्षाकवच नसल्यामुळे फोन खणखणला की घरातले हातावर हात ठेवून काळजीत पडतात आणि पटवर्धन पिता-पुत्र पाण्याखालील जीवघेणा थरारक खेळ खेळण्यासाठी सज्ज होतात.