ठाणे : गर्दीमध्ये रेल्वे गाडी पकडण्यासाठी धडपडणारे प्रवासी, रेल्वे गाड्यांचा विलंब आणि आता छत नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. ठाणे स्थानकातील फलाटांवरील काही भागात अद्यापही छत दुरुस्तीचे काम पुर्ण झाले नसल्याने अवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
ठाणे शहर तसेच कल्याण पलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच नवी मुंबईच्या दिशेने अनेकजण जात असतात. दररोज ठाणे स्थानकातून लाखो प्रवाशांचा प्रवास सुरु असतो. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग, तसेच विविध खासगी कार्यालये आहेत.
दररोज या भागांमध्ये विविध शहरातून रेल्वे मार्गे नोकरदार येत असतात. त्यामुळे ठाणे स्थानक परिसर नेहमीच प्रवाशांनी भरलेला असतो. या स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. फलाट क्रमांक पाचवरुन मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर फलाट क्रमांक सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्या धावतात. याच फलाटांवरुन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचीही वाहतुक होते. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. या भागातील छताच्या दुरुस्तीचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. याकरिता ठाणे स्थानकातील फलाटावरील पत्रे काढण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा झळा सहन कराव्या लागत होत्या. रेल्वे प्रशासनाच्यावतीने फलाटांवरील काही भागातील छत दुरूस्त करण्यात आले. मात्र, उर्वरीत भागात अद्यापही छत उभारणी झाली नसल्याने अवेळी आलेल्या पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. या मध्ये फलाट पाच- सहावरील सरकत्या जिन्याच्या भागात छत नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचे चित्र होते.
कोणत्या भागात छत नाही ?
फलाट पाच सहावरील कल्याण दिशेकडील काही भागात तसेच, सरकत्या जिन्याजवळ छत नाही. तसेच फलाट एकवरील मुंबई दिशेकडील काही भागात छत नसल्याचे चित्र आहे.
फलाट पाचवर होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरणाचे काम मागील वर्षी पुर्ण केले होते. फलाटाची रुंदी वाढल्याने यावरील छताचा भाग अपूरा पडत होता. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या साहाय्याने ताडपत्रीचे छताची उभारणी केली होती. त्यामुळे मागील वर्षीही पावसाच्या पाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. अशातच यंदाही हे काम अर्धवट पुर्ण झाले असून पावसाळ्यापुर्वी काम होईल का असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येते आहे.
प्रतिक्रिया
ठाणे स्थानकात भर उन्हाळ्यात छत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काही भागात अजुनही छत नसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे त्रास सहन करावा लागला. वैभव शिंदे , प्रवासी
ठाणे स्थानकात छत उभारणीचे काम सुरू आहे. ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पी. डी . पाटील, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी