माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची मेट्रो प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट
कल्याण – बदलापूर शहर परिसरातील नागरीकरणाचा वाढता वेग विचारात घेऊन बदलापूर शहर परिसर मुंबईत कांजुरमार्ग, कल्याण परिसरातून मेट्रो मार्गाने जोडण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. तसेच, हे प्रकल्प गतीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची मागणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मूलभूत सुविधांतर्गत आशय असलेल्या या पत्राची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगरविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांना पत्र लिहून ठाणे भिवंडी कल्याण शहराकडे येणारी मेट्रो ५ बदलापूर शहराकडे विस्तारित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मुंबईतून कांजुरमार्ग ऐरोली शिळफाटा काटई ते बदलापूर प्रस्तावित मेट्रो १४ या मार्गिकेचे काम युध्दपातळीवर सुरू होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कल्याण ते बदलापूर आणि कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गांसंदर्भात आवश्यक त्या कार्यवाही करून स्वयंस्पष्ट अहवाल नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंग पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मागविला आहे.
मागील दोन ते तीन वर्षापासून पातकर कल्याणचा मेट्रो मार्ग बदलापूरपर्यंत विस्तारित करण्यासाठी आणि प्रस्तावित कांजुरमार्ग ते काटई बदलापूर मेट्रो १४ मार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू होईल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत.
मुंबईजवळचे एक आखीव रेखीव पध्दतीने विकसित होणारे, एक शांत शहर म्हणून बदलापूर शहर परिसराची ओळख आहे. त्यामुळे अधिक संख्येने नागरिक निवासासाठी या शहराला पसंती देत आहेत. या शहरातील बहुतांशी वर्ग हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पश्चिम उपनगरात नोकरी करणारा आहे. या वाढत्या लोकसंख्येला प्रवासासाठी फक्त रेल्वे मार्ग हा एकमेव आधार आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे मार्गा बरोबर बदलापूर शहर मेट्रो मार्गांनी जोडणे आवश्यक आहे, असे पातकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
ठाणे, भिवंडी ते कल्याण मेट्रो ५ मार्गाचे काम गतीने सुरू आहे. हे काम सुरू असताना कल्याण शहरातून जाणाऱ्या मेट्रोचा मार्ग आता शिवाजी चौक मार्गे न ठेवता तो आधारवाडी चौक, खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय, प्रेम ऑटो, शहाड पेट्रोल पंप, सुभाष चौक ते कल्याण पश्चिम असा आहे. कल्याणमधील हाच मेट्रो ५ मार्ग सुभाष चौक, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, लादी कारखाना, फाॅरेस्ट नाका, बदलापूर बस स्थानकापर्यंत मेट्रो १४ पर्यंत विस्तारित करावा. फाॅरेस्ट नाका ते चिखलोली येथे कल्याण मेट्रो मार्ग मेट्रो १४ ला जोडावा. या मेट्रो मार्ग जोडण्यांमुळे बदलापूर शहर मुंबई, ठाणे, कल्याण, तळोजा मेट्रोमार्गामुळे एकाचवेळी जोडले जाणार आहे. या भागात मेट्रो मार्ग सुरू असताना बदलापूर मेट्रो मार्गाची कामे त्वरेने हाती घेण्याची मागणी पातकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बदलापूर शहर परिसराचे नागरीकरण, वाढता नोकरदार वर्ग विचारात घेता रस्ते, रेल्वे मार्गा बरोबर हा भाग आता मेट्रो मार्गाने जोडणे आवश्यक आहे. म्हणून मुख्यमंत्री, शासनस्तरावर हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. राम पातकर, माजी नगराध्यक्ष, बदलापूर.