उन्हाच्या तीव्र झळांचा परिणाम; २० टक्क्यांनी दरवाढ
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांवर होत असतानाच आता तीव्र उन्हामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरातही प्रचंड वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्याभरात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात वाढ केलेली पाहायला मिळाली. मात्र आता उन्हाच्या तीव्र झळांमुळे पुणे, नाशिक, शहापूर, मुरबाड या ठिकाणी लागवड होणाऱ्या भाज्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक ५० ते ६० टक्क्य़ांनी घटली असून त्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. भेंडी, फरसबी, गवार, घेवडा, पडवळ, वाटाणा, तोंडली या भाज्या घाऊक बाजारात चार रुपये ते २५ रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात २० रुपये ते ५० रुपयांनी महाग झाल्या आहेत. घाऊक बाजारात १५ दिवसांपूर्वी ४० रुपये प्रति किलोने विकली जाणारी भेंडी सध्या ४४ रुपयांनी तर, ३६ रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी सध्या ४५ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. गवार आणि घेवडा यांच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून गवार सध्या ६५ रुपये तर, घेवडा ४० रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. तसेच पडवळ, वाटाणा आणि तोंडलीच्या दरात ८ ते २५ रुपयांनी वाढ झाली असून सध्या त्यांची विक्री ३० ते ६० रुपये प्रति किलोने केली जात आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या तीव्र झळांचा फटका हा भाजीपाल्याच्या पिकांवर पडत असून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक रोडावली असून त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे भाजी विक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.
पालेभाज्याही महाग
उन्हाच्या तीव्र झळांचा परिणाम हा भाजीपाल्याच्या पिकांवर होऊ लागला असून त्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. इतर भाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक ७५ टक्क्य़ांनी घटली असल्याचे पालेभाजी विक्रेते सुधाकर जाधव यांनी सांगितले. किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर आणि शेपू या भाज्यांच्या दरात ८ ते २० रुपयांनी वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात १२ ते ५० रुपयांनी या भाज्यांची विक्री केली जात आहेत.
भाज्यांचे दर (किरकोळ)
भाज्या १५ दिवसांपूर्वी सध्या
भेंडी ६० रुपये/किलो ८०
फरसबी ५० ८०
गवार ६० ८०
घेवडा ६० ८०
पडवळ ४० ६०
वाटाणा ५० १००
तोंडली ६० ८०
