ठाणे : ठाणे शहरात दिवाळीमध्ये वाहन खरेदीत चैतन्य आले आहे. यावर्षी दिवाळीच्या आठवडाभरामध्ये ठाणे शहरात पाच हजार ६८३ वाहनांची नोंदणी झाली आहे. २०२४ मध्ये दिवाळी सणानिमित्ताने वाहन खरेदीचे प्रमाण तीन हजार ७९५ इतके होते. वस्तू आणि सेवा करामधील (जीएसटी) कपात, नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा वाढलेला कल यामुळे वाहन खरेदी वाढल्याचे वाहतुक तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत रोडावले आहे.

दिवाळी निमित्ताने दरवर्षी वाहन खरेदी होत असते. केंद्र सरकराने दुचाकी आणि चारचाकी वाहन प्रकारामधील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील जवळपास प्रत्येक वाहन विक्री केंद्रावर जीएसटी कपातीची माहिती दिली जात होती. त्याची जाहिरात ठिकठिकाणी करण्यात आली. या जाहिरातीचा सकारात्मक परिणाम वाहन विक्रीवरही झालेला दिसतो. दिवाळी सणानिमित्ताने १३ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत पाच हजार ६८३ वाहनांची ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झाली. तर २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२४ यावर्षी दिवाळी सणानिमित्ताने तीन हजार ७९५ वाहनांची नोंदणी झाली होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील वाहन खरेदी झाली होती. यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १६१ वाहन खरेदी झाली. तर गेल्यावर्षी लक्ष्मीपूनजनाच्या दिवशी हे प्रमाण अवघे ३७ इतके होते.

इलेक्ट्रिक वाहनाच्या नोंदणीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यावर्षी अवघ्या पाच इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये तीन दुचाकी आणि दोन मोटारींचा सामावेश आहे. तर गेल्यावर्षी हे प्रमाण ३५ इतके होते.

यावर्षी दिवाळीत सर्वाधिक विक्री झालेल्या वाहनांमध्ये दुचाकी आणि मोटारींचा अधिक सामावेश आहे. ठाणे शहरात दोन हजार ८७४ दुचाकी आणि ९४२ मोटारींचा सामावेश आहे.

जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर वाहन खरेदीच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते आहे. त्यासोबत नागरिकांचा देकील वाहन खरेदीकडे कल वाढलेला आहे. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

कोणत्या वाहनांची किती नोंदणी

ट्रॅक्टर १५
दुचाकी २८७४
मोटारी ९४२
२५ सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी
इतर १८४४
एकूण ५६८३