डोंबिवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडी नेसवलेली प्रतिमा सोमवारी दिवसभर डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा उर्फ प्रकाश पगारे यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली. या प्रकारामुळे डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे काँग्रेस नेते मामा पगारे यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यासाठी भाजप डोंबिवली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते मामा उर्फ प्रकाश पगारे यांना मानपाडा रस्त्यावर गाठले. आणि त्यांना भर रस्त्यात पकडून त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी नवाकोरा भरजरी शालू नेसवला.

डोंबिवलीतील एका जुन्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला भर रस्त्यात साडी नेसविण्याचा प्रकार पाहून प्रवासी आश्चर्य व्यक्त करत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडी नेसलेली प्रतिमा मामा पगारे यांनी समाज माध्यमांत प्रसारित केली होती. या प्रतिमेच्या सोबत ‘मी कशाला आरशात पाहू ग, मी माझ्या रूपाची खाण ग, मी कशाला बंधनात राहू ग’, हे गाणे सामायिक केले होते.

हा प्रकार पाहून कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडल अध्यक्ष करण जाधव, भाजप पदाधिकारी संदीप माळी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दत्ता माळेकर आणि इतर पदाधिकारी संतप्त होते.

भरजरी शालू खरेदी

मामा पगारे डोंबिवलीत राहतात. ते सकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्ता भागात असतात. अशी गुप्त माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना मिळाली. त्याप्रमाणे मामा पगारे यांना सकाळच्या वेळेत भर रस्त्यात साडी नेसविण्याचा निर्णय सोमवारी रात्री भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला.

भोपरचे भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी डोंबिवलीतील एका कपडा दुकानातून पाच हजार रूपये किमतीचा भरजरी शालू मंगळवारी सकाळी खरेदी केला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, दत्ता माळेकर, करण जाधव, संदीप माळी यांनी पगारे यांना मानपाडा रस्त्यावर गाठले. मामा पगारे पांढरा शुभ्र सदरा, विजार आणि लख्ख पाॅलिश केलेले काळे बूट घालून होते. पगारे यांना पाहताच भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांचे दोन्ही हात पकडले. संदीप माळी आणि माळेकर यांनी मामा पगारे यांना शालू नेसविण्यास सुरूवात केली.

अरे, तुम्ही हे काय करता, असे त्वेषाने बोलत मामा पगारे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला. एका पदाधिकाऱ्याने मामांना हाताने गालगुच्छा घेतला आणि असे काही परत करू नका, असा सल्ला देत पदाधिकारी तेथून निघून गेले. अधिक माहितीसाठी मामा पगारे यांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिला वेशातील प्रतिमा काँग्रेस नेते मामा पगारे यांनी समाज माध्यमांत प्रसारित केली होती. त्यासोबत एक गाणे सामायिक केले होते. भाजपचे पंतप्रधानच काय भाजपच्या कोणाही नेत्याची कोणीही समाज माध्यमात बदनामी केली तर त्याला भाषेत भाजप पदाधिकारी प्रत्युत्तर देतील. म्हणून मामा पगारे यांना आम्ही भर रस्त्यात शालू नेसविला. – नंदू परब भाजप जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा.