१३ जागांपैकी एक ठिकाणी विजय, तर ३ ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते
ठाणे जिल्ह्य़ामध्ये बिकट अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढली असल्याचे आलेल्या निकालांवरून पाहायला मिळत आहे. जिल्ह्य़ातील १८ जागांपैकी १३ जागांवर मनसेने यंदाची निवडणूक लढवली होती. त्यापैकी कल्याण ग्रामीणच्या जागेवर मनसेने विजय मिळवला असून तीन जागांवर मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.
राज ठाकरे यांनी १३ वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फारकत घेत स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २००९च्या विधासभेत १३ आमदार निवडून आले होते. ठाणे जिल्ह्य़ात कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिमेतून त्या वेळी मनसेचे आमदार निवडून आले होते. मधल्या काळात पक्षाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली, तर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत राज्यभरातून मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला आणि तोही पुढे शिवसेनेत गेला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हातात असलेली नाशिक महापालिकेची सत्ताही पक्षाच्या हातून निसटली होती. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोणताही उमेदवार उभा न करता घेतलेल्या सभांमधून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. मात्र या सभांचा कोणताही परिणाम सत्ताधाऱ्यांवर झाला नाही. त्याउलट महायुतीचे ४१ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले होते. त्यामुळे येणाऱ्या विधासभा निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. दरम्यान, राज यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मनसे निवडणूक लढवणार की नाही, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर मनसेने राज्यभरात एकूण १०० जागा लढविण्याचे ठरवले. त्यापैकी ठाणे जिल्ह्य़ातील १८ जागांपैकी मनसेने १३ जागांवर निडणूक लढवली.
जिल्ह्य़ातील भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, ऐरोली आणि बेलापूर या ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले होते. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. या ठिकाणी या दोन्ही पक्षांनी मनसेला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज यांनी ‘राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या’ असे आवाहनही नागरिकांना केले होते. तसेच त्यांनी जिल्ह्य़ात चार सभाही घेतल्या होत्या. या सगळ्यांचा परिणाम जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येत असून जिल्ह्य़ात मनसेची ताकद वाढल्याचे निकांलावरून दिसून आले आहे. जिल्ह्य़ात लढवलेल्या १३ जागांपैकी मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील विजयी झाले असून भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, ठाणे शहर या ठिकाणी मनसेने द्वितीय क्रमांकाची मते मिळवली आहेत. त्यापैकी ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि डोंबिवलतील मुख्यमंत्र्यांचे निवटवर्तीय मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांना मनसेच्या उमेदवारांनी चांगलीच टक्कर दिली आहे. ठाणे शहरात मनसेला शिवसेनेची साथ मिळाल्याची चर्चा असून डोंबिवलीतही राज्यमंत्री चव्हाणांना मंदार हळबे यांनी चांगली लढत दिली.