कल्याण : डोंबिवली जवळील गोळवली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डाॅ. वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यामधील दहा आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. अठरा वर्ष हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता.
याप्रकरणात विजय बाबुराव बाकाडे (४२), सुनील रामचंद्र भोईर (५४), साजीद हमीन शेख (४०) यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश बाबुराव पाटील, विशाल कृष्णा पिल्ले, संतोष रघुनाथ केणी, अरूण रामचंद्र भोईर, सखाराम बळीराम गायकर, नीलेश चंंद्रकांत चौधरी, दत्ता मच्छिंद्र दराडे, स्टॅनली जाॅन अब्राहित, ललित जनार्दन महाजन आणि प्रदीप बद्रीनारायण नायडू अशी या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. अश्विनी भामरे पाटील, आरोपींतर्फे ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. हरिश सरोदे, ॲड. चंद्रकांत सोनवणे यांनी काम पाहिले. न्यायालय समन्वयक म्हणून मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार ए. आर. गोगरकर यांनी काम पाहिले.आरोपीच्या वकिलांनी दिलेली माहिती अशी की, सन २००६ मध्ये बाळू भोईर यांची गोळवली गावात हत्या झाली होती. ही हत्या विजय वंडार पाटील आणि त्यांंच्या साथीदारांनी केल्याचा भोईर कुटुंबीयांचा आरोप होता. या खून प्रकरणातून गोळवलीत वातावरण तापले होते.
आरोपीच्या वकिलांनी माध्यमांंना सांगितले, १० एप्रिल २००७ रोजी संध्याकाळी चार वाजता विजय वंडार पाटील, जखमी सुबोध जगताप आणि इतर ग्रामपंचायत सदस्य गोळवली ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून हातात पिस्तूल, चाॅपर, तलवारी अशी प्राणघातक हत्यारे घेऊन आरोपींनी विजय वंडार पाटील यांच्यावर गोळीबार आणि चाॅपर आणि तलवारीने वार करून जीवे ठार मारले. यावेळी साथीदार सुबोध जगताप वाद सोडविण्यासाठी मध्ये पडले तर त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारदारातर्फे करण्यात आला होता. चिंचपाडा काटेमानिवलीचे मोतिराम भोये यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मानपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पांढरे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
या गुन्ह्याच्यावेळी एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा घडला त्यावेळी महेश पाटील हे कल्याण न्यायालयात वाॅरन्ट रद्द करण्यासाठी आले होते. त्यामुळे ते घटनास्थळी नव्हते. इतर आरोपींचा या गुन्ह्यातील सहभाग सबळ पुराव्याने सरकार पक्षाला दाखविता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदार, प्रतिवादी, सरकार पक्षाची बाजू ऐकून या गुन्ह्यात सहभाग असलेल्या तीन जणांना जन्मठेप, तर इतर दहा जणांची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली. या जन्मठेपविषयी आम्ही वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. या गुन्ह्यातील काही जण यापूर्वी तडीपार होते. एक आरोपी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोळवलीतील जमीन हडप प्रकरणात सहभागी होता.