ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग जसा गडकरी रंगायतन नाटय़गृह, मासुंदा तलाव, उद्याने, सिनेमागृह, शैक्षणिक संस्था आदीं प्रकल्प सौंदर्यानी नटलेला आहे, तशी शहराची वेसही गगनचुंबी इमारतींनी वेढली गेली आहे. जुन्या ठाणे शहराच्या टोकावर आणि  घोडबंदर रस्त्याच्या प्रवेशद्वारापासून थोडय़ा अंतरावर एलबीएस मार्गावर उभे राहिलेले विकास कॉम्प्लेक्स हे गृहसंकुल त्यापैकीच एक. कॅसल मिल म्हणून ओळख असलेला हा परिसर आता विकास कॉम्प्लेक्स नावानेही ओळखला जाऊ लागला आहे.
विकास कॉम्प्लेक्स,कॅसल मिल, ठाणे (प)
एकेकाळची टुमदार आणि नीटनेटक्या ठाणे शहराला आणि वाहतूक कोंडी, कर्कश गोंगाटाचे ध्वनिप्रदूषण, अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आदींचे ग्रहण लागले आहे. शहरात प्रवेश करताच त्याचा प्रत्येकाला अनुभव येतोच. परंतु शहराच्या थोडे आत गेल्यावर ही अशांतता काही ठिकाणी हळहळू कमी होते. ती काही गृहसंकुलांमध्ये गेल्यावर जाणवते. अशातलेच एक म्हणजे विकास कॉम्प्लेक्स हे गृहसंकुल. कॅसल मिल येथील मीनाताई ठाकरे चौकाजवळील ‘विकास कॉम्प्लेक्स’ गेल्या १५ वर्षांपासून दिमाखात उभे आहे.
कॅसल मिल म्हणजे पूर्वाश्रमीचा कपडेनिर्मिती करणारा कारखाना. पाच ते सहा एकर जागेवर असलेला हा कारखाना बंद पडल्यानंतर त्या जागी गृहसंकुले उभी राहिली. त्यातीलच एक विकास कॉम्प्लेक्स. कारखान्याची सर्वाधिक जागा या गृहसंकुलाने व्यापली आहे. २००० मध्ये दोन फेज विभागले गेलेले गृहसंकुल उभारण्यात आले आहे. या संकुलातील ९० टक्के रहिवासी महाराष्ट्रीय आहेत. फेज एकमध्ये पाच इमारती तर फेज दोनमध्ये पाच इमारती अशा १० ते १२ मजल्यांच्या भव्य इमारती झाडाझुडपांमध्ये निसर्गाशी मैत्री करीत दिमाखात उभ्या आहेत. मीनाताई ठाकरे चौकामुळे या परिसराच्या सौदर्यात भर पडली आहे. या चौकातून ठाणे स्थानक, वृंदावन, श्रीरंग सोसायटी आणि घोडबंदर रस्त्याला जाता येते. आता विकास कॉम्प्लेक्समधूनही एक रस्ता काढण्यात आला आहे. तो थेट महामार्गाला जाऊन मिळतो. पूर्वी हा रस्ता नव्हता. विकास कॉम्प्लेक्सच्या मालकीची ही जागा असल्याने तेथून रस्ता काढण्यास मनाई होती. परंतु तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या काळात शहर विकासाच्या टप्प्यावर आले असताना चंद्रशेखर यांनी विकास कॉम्प्लेक्सला जादा एफएसआय देऊन त्यांच्या जागेतून थेट महामार्गाला जोडणारा रस्ता काढला. या रस्त्यामुळे गृहसंकुलाचे दोन फेज वेगळे झाले. एक रस्त्याच्या डावीकडे तर दुसरा उजवीकडे. मात्र तांत्रिक दृष्टय़ा दुभंगल्या गेल्या तरी या इमारती मनाने कधीच दुभंगल्या नाहीत. बांधकाम व्यावसायिकाने इमारती नियोजनबद्धरीत्या उभ्या केल्या. परंतु पुढे त्या विकासाच्या दृष्टीने मागेच राहिल्या.
२००२ मध्ये सोसायटी स्थापन झाल्यानंतर या संकुलाचा खऱ्या अर्थाने विकास साधला गेला. फेज एकमध्ये पाच इमारती आहेत. त्यात भव्य उद्यान, क्लब हाऊस, पोहण्यासाठी तलाव, जिमखाना, जॉगिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क तसेच मुलांसाठी खेळ उद्यान आज अत्याधुनिक साधनसामुग्रीने सज्ज आहे. फेज एकसह फेज दोनमधील रहिवासी त्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. खाजगी कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर रत्नाकर आंबेकर यांनी गेल्या १५ वर्षांपासून संकुलाच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले आहे. दोन्ही फेज मिळून एक फाऊंडेशन तयार करण्यात आले. त्यांचे सहकार्य हे नेहमीच आंबेकर यांना लाभते. संकुलातून ज्यावेळी रस्ता तयार करण्यात आला, त्यावेळी खाजगी बसेस, अनधिकृत विक्रेत्यांनी येथे बस्तान मांडले. त्यामुळे संकुलाच्या सौंदर्याला बाधा आली. आंबेकर यांनी सातत्याने प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून ही समस्या सोडविली. आज या रस्त्यावर शाळेच्या बसेसव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी बसेस धावत नाही आणि रस्त्यावर अनधिकृत विक्रेतेही दिसत नाहीत.
संकुलात वर्षभरातील सण, उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. प्रजासत्ताक दिनी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खाद्यपदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री असणारा आनंद मेळा येथे भरतो. दिवाळीची पूर्वसंध्याही येथे साजरी केली जाते. संकुलातील रहिवाशांचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असतो. फेज २ मध्ये वाचनालयही आहे. ते विनामूल्य चालविले जाते.  नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभते.
पर्जन्य जलसंधारण, कचरा व्यवस्थापन  
पाणीजीवनाचा अविभाज्य घटक असल्याने त्याची साठवणूक व जपणूक ही प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून पर्जन्य जलसंधारणाचा प्रकल्प या संकुलात राबविण्यात आला. या प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचा वापर वर्षभर उद्यानातील झाडे, फुलांसाठी तसेच प्रसाधनगृहासाठी करणे शक्य होत आहे. तीन दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवण्याची क्षमता येथील टाक्यांमध्ये असल्यामुळे शहरात जरी पाण्याची बोंब असली तरी संकुलात पाणी मात्र २४ तास असते. प्रत्येक रहिवाशाकडून ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाते.  त्यामुळे सुका कचरा ठाणे महापालिकेच्या घंटागाडय़ा घेऊन जातात, तर ओला कचरा समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था खत बनविण्यासाठी घेऊन जाते.
पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्था
पार्किंगच्या बाबतीतही येथे खबरदारी घेण्यात आली आहे. पूर्वी बांधकाम व्यावसायिकाने रहिवाशांना पार्किंगसाठी हवे तेवढी जागा दिली होती. त्यामुळे कुणाला दोन तर कुणाला तीन गाडय़ा पार्क करता येतील, इतकी जागा मिळाली होती. मात्र सोसायटी झाल्यांनतर येणाऱ्या प्रत्येक नवीन रहिवाशाला एकच पार्किंग देण्यात आले आहे. ‘गाडी दाखवा आणि पार्किंग करा’ असा नियमच तयार केला असून जादा गाडय़ा असतील तर त्या बाहेरील रस्त्यावर उभ्या कराव्यात असा कडक नियम करण्यात आला आहे. २४ तास सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरासह तैनात आहे. आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाडय़ा संकुलात येण्यास प्रवेशद्वार अपुरे पडत असल्याचे पाहून त्यांनी तो वाढवून अग्निशमन दलाच्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. प्रत्येक घरात गॅसपाइपलाइन असून लिफ्टला बॅकअप देण्यात आल्याने १२ मजले चढून जाण्याची वेळ अद्याप तरी कुणावरही आली आही.
मैदानाचा वाद न्यायालयात  
संकुलासाठी एक खेळाचे मैदान राखीव आहे, पंरतु बांधकाम व्यावसायिकाचा त्या जागेवर इमारती उभ्या करण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी  विकास कॉम्प्लेक्स फाऊंडेशनने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने फाउंडेशनच्या बाजूने निकाल दिला. परंतु आता हे प्रकरण बांधकाम व्यावसायिकांने उच्च न्यायालयात नेल्याने हे मैदान खेळापासून दूर आहे. पूर्वी या मैदानावर क्रिकेटचे सामने होत असत. परंतु आता या मैदानावर जंगली झाडे उगवली असून मैदान त्यात गडप झाले आहे. संकुलाच्या जागेत वीज मंडळाचे उपकेंद्र असून काही जागेचा वापर गोडावून म्हणून करण्यात आले आहे. या जागेवर हक्क असूनही जागेसाठी भांडावे लागत आहे, अशी माहिती सचिव रत्नाकर आंबेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकुलातील समस्या
* संकुलातील मैदानावर हक्क असूनही बांधकाम व्यावसायिकाचा इमारत बांधण्याचा प्रयत्न
* हक्काच्या जागेवर वीज मंडळाचे गोडाऊन
* कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्स अद्याप मिळाले नाही.
* संकुलातील खाजगी जागेतून गेलेल्या सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणे कठीण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas complex in castle mills compound thane
First published on: 30-06-2015 at 12:15 IST