|| कीर्ती केसरकर
विरार रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गातून सुखरूपरीत्या घरी पोहोचण्याची प्रवाशांना शाश्वती राहिलेली नाही. भुयारी मार्गात वाढत्या प्रवासी संख्येमुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दी होत असून या गर्दीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने चेंगराचेंगरीची भीती व्यक्त केली जात आहे.
विरार स्थानकात रोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. रेल्वे प्रवाशांची वाढत्या संख्येमुळे भुयारी मार्गातील गर्दीत भर पडत आहे. त्यामुळे त्यावर पश्चिम रेल्वेच्या वतीने उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये आणि अपघात थांबावे यासाठी रेल्वे तर्फे भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र स्थानकातील वाढती गर्दी मुळे भुयारी मार्गातील गर्दीत भर पडली आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पूलही बांधण्यात आले. तरी हा भुयारी मार्ग प्रवाशांना जास्त सोयीचा ठरत असल्याने प्रवासी त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात करत आहेत. भुयारी मार्गामधली गर्दी वाढत असली तरी रेल्वेच्या वतीने देणाऱ्या सुविधांमध्ये वाढ झालेली नाही.
भुयारी मार्गाचा वापर वाढला असला तरी फलाट क्रमांक दोनचा भुयारी मार्ग अरुंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. तसेच सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी गर्दी असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
धक्काबुक्की, मारामारी रोजचीच
विरार स्थानक भुयारी मार्गाजवळ सुरक्षा रक्षक वा रेल्वे पोलीसही उपलब्ध नसतात. यामुळे गर्दीतून चालताना धक्काबुकी, मारामारी, छेडछाडीचे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच गर्दी वाढत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका कायम आहे. पावसाळ्यात भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवर पाणी असते, यामुळे घसरून पडण्याची शक्यता वाढते. तर गर्दीच्या वेळेस यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. प्रवाशांना एका रांगेत पाठवणे वा चढणाऱ्या प्रवाशांसाठी उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.