ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करुन रयतेचे राज्य स्थापन केले होते. पण, त्यांनी कधीच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे हिंदुत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे सांगत परांजपे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.

शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तुलना केली होती. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. आनंद परांजपे म्हणाले की, सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे नेते करीत आहेत. आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी सुटका केली. या ऐतिहासिक प्रसंगाची तुलना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गद्दारीशी केली आहे. मंगलप्रभात लोढा हे जरी संविधानिक पदावर असले तरी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था या बद्दल मला शंका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराजांनी आदिलशाही, निजामशाही, मोघल या तिन्ही सत्ताधीशांच्या विरोधात लढाया करुन रयतेचे, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पण, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्रातून पळाले आणि सुरतला गेले. सुरतहून गुवहाटीला गेले, गुवाहाटीवरुन गोव्याला गेले आणि नंतर महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री झाले. त्यांनी हिंदूत्वाच्या पाठित खंजीर खुपसला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसला. अशा माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे याच्यापेक्षा घाणेरडे राजकारण या महाराष्ट्राने पाहिलेले नाही. म्हणून मंगलप्रभात लोढा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे.