डोंबिवली – मुसळधार पावसामुळे डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील बस थांब्याजवळ आणि नेहरू रस्त्यावरील गणेश मंदिराजवळ पाणी तुंबत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बुधवारी रात्री आपत्कालीन पथकाच्या साहाय्याने या दोन्ही ठिकाणी पाणी निचरा होण्याची सुविधा निर्माण करून याठिकाणी पावसाच्या पाण्याचा तात्काळ निचरा होईल अशी व्यवस्था केली.

डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावरील गणेश मंदिराच्या बाजुला ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे. याठिकाणी मुसळधार पावसाचे पाणी तुंबत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. नेहरू रस्त्यावरून ठाकुर्ली पुलाकडे, कल्याणकडे जाणारी वाहने धावतात. याशिवाय फडके रस्ता, नेहरू मैदान येणारी रस्त्याने धावणारी वाहने याच रस्त्याने जातात. मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणी तुंबत होते. रस्त्यालगतच्या गटारांची पाणी वाहू छिद्रे चिखलाने भरून गेली होती. त्यामुळे पावसाचे रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यात अडथळा येत होता.

गणेश मंदिराच्या बाजुला नेहरू रस्त्यावर पाणी तुंबत असल्याची माहिती मिळताच फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी अभियंता शिरीषकुमार नाकवे, अवधूत मदन, वरिष्ठ लिपिक शिरीष भोईर आणि आपत्कालीन पथक सोबत घेऊन बुधवारी रात्रीच नेहरू रस्त्यावर तुंबलेले पाणी गटारांची छिद्रे मोकळी करून, या भागातून पाणी गतीने वाहून जाण्यासाठी रस्त्यावर स्वतंत्र व्यवस्था केली. त्यामुळे नेहरू रस्त्यावर गणेश मंदिराच्या बाजुला पाणी तुंबण्याचा प्रकार रात्रीपासून बंद झाला आहे. याविषयी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपत्कालीन पथकाने बाजीप्रभू चौकात एमआयडीसी बस थांब्याजवळ तुंबणारे पाणी रस्त्याच्या कडेला चर काढून कमी केले. या भागात खोलगट रस्ता असल्याने पावसाचे पाणी तुंबते. हे पाणी मुसळधार पाऊस पडला तरी वाहून जाईल अशी व्यवस्था साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी आपत्कालीन पथकाकडून करून घेतली. एमआयडीसी बस थांब्यावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनी या बद्दल समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरू रस्त्यावर गणेश मंदिराजवळ, बाजीप्रभू चौकात रस्त्याच्या कडेला चर काढून, गटारांची गाळाने बंद झालेली रस्त्याकडेची छिद्रे मोकळी करून पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था या दोन्ही ठिकाणी केली आहे. मुसळधार पाऊस पडला तरी याठिकाणी पाणी तुंबणार नाही. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.