डोंबिवली – गेल्या वर्षभरात कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. आता मुबलक पाऊस पडून, धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा असुनही डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा गोपीनाथ चौक भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कमी दाबाने पाणी येण्यास सुरूवात झाल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

पालिकेकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत अर्धा ते पाऊस तास मुबलक पाणी येत होते. यामुळे इमारतीच्या तळटाक्या भरून इमारतीवरील टाक्यांमध्ये पाणी साठा शिल्लक राहत होता. यामुळे रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. गेल्या वीस दिवसांपासून पालिकेकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे इमारतीच्या लगत असलेली पाण्याची टाकी एक ते दीड फूट भरते. एका सोसायटीत कमीत कमी २५ कुटुंबे आहेत. काही सोसायट्यांमध्ये ५० ते ६० कुटुंबे राहतात. त्यांना दिवसभरात आलेले हे पाणी पुरत नाही. त्यामुळे पालिकेच्या टँकरवर अवलंंबून राहावे लागते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौक भागातील श्वेता व्हिला, गुना भास्कर आर्केड, गजानन आर्केड, देवकी लक्ष्मण अपार्टमेंट, शेवंता हाईट्स, सदगुरू आर्केड आणि परिसरातील इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अनेक रहिवाशांनी या पाणी टंचाई संदर्भात पालिकेत तक्रारी केल्या आहेत. पाच महिने मुबलक पाऊस पडुनही आता पाणी टंचाई सुरू झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. आता दिवाळी सणाच्या काळात ही झळ अधिक प्रमाणात बसू लागल्याने रहिवाशांचा पाणी टंचाई विषयीचा तक्रारीचा सूर वाढू लागला आहे. दिवाळी सणात सुट्ट्या असतात. पाहुणे घरी आलेले असतात. पाण्याचा वापर अधिक असतो. अशा परिस्थितीत घरात मुबलक पाणी नसल्याने नागरिक विशेषता महिला वर्गात तीव्र नाराजी आहे.

सोसायटीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो म्हणून प्रत्येक सोसायटीने आपल्या सोसायटीकडे पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून येणाऱ्या जलवाहिन्यांची प्लम्बरकडून तपासणी करून घेतली. पण जलवाहिन्या सुस्थितीत असल्याचे रहिाशांच्या लक्षात आले.दरम्यान, गरीबाचापाडा, देवीचापाडा भागात रस्ता सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी गटार बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांसाठी एमएमआरडीएच्या ठेकेदाराने अनेक ठिकाणी जलवाहिन्या तोडल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या अभियंत्याने दिली. देवीचापाडा भागात पाणी टंचाईचा प्रश्न नाही, असे अभियंत्याने सांगितले.

गरीबाचापाडा भागात काँक्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत. या भागात गटार बांधणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या जलवाहिन्या तोडल्या आहेत. अशा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असलेल्या भागाला अन्य भागातून पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केली जात आहे. – उदय सूर्यवंशी, उपअभियंता, पाणी पुरवठा, ह प्रभाग.