कल्याण: कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांना महावितरणकडून होणारा वीज पुरवठा रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी (ता. २७) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहर परिसराला मंगळवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी दिली.

महावितरणचे २२ किलोवॅट क्षमतेचे एनआरसी -२ विद्युत पुरवठा करणारे रोहीत्र आहे. या रोहित्रावरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रास वीज पुरवठा केला जातो.

महावितरणच्या एनआरसी-२ या रोहित्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणने मंगळवारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महावितरणने पालिकेला त्यासंदर्भात कळविले आहे.महावितरणने जलशुध्दीकरण केंद्रांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या दिवशी जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने, या कामातच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वीची बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रांमधील विद्युत आणि यांत्रिक उपकरणांची देखभाल दुरुस्ती कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पालिकेच्या उल्हास नदी काठच्या बारावे, नेतिवली, टिटवाळा आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्रांमधून कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, टिटवाळा शहर परिसरातील वडवली, आंबिवली, मांडा, अटाळी, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.मंगळवारी दुरुस्तीसाठी जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे करण्यात आले आहे.