कल्याण – गणेशोत्सवापूर्वीच्या खरेदीसाठी एकाचवेळी नागरिक पायी, वाहने घेऊन घराबाहेर पडले आहेत. यामुळे बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. त्याच बरोबर या बाजारपेठांमध्ये प्रवेश नसताना चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन काही वाहन चालक शिरल्याने डोंबिवली, कल्याण शहरातील बाजारपेठा कोंडीने जाम झाल्या आहेत. त्याच बरोबर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, फुले खरेदीसाठी फूल विक्रेते, नागरिक यांची झुंबड उडाल्याने पहाटेपासून पत्रीपूल ते शिळफाटा, तिसगाव ते नेवाळ रस्ता कोंडीने गजबजून गेला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात, आपल्या शहर परिसरात जाणारे गणेशभक्त या कोंडीत अडकून पडले आहेत. पत्रीपूल ते मानपाडा जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. वाहतूक पोलीस जागोजागची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, रस्त्यावरील वाहनांची संख्या दामदुप्पट असल्याने वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस, सुरक्षा बळाचे कमांडो वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कल्याण शीळफाट रस्त्यावर गवार कंपनीकडून मेट्रोच्या भूमिगत केबल वाहिन्या टाकण्याचे काम करत आहे. भूमिगत केबल टाकून झाल्यानंतर त्यावरील भाग पुन्हा रस्त्यासारखा गुळगुळीत सुस्थितीत करण्याऐवजी या कंपनीचे कामगार केबल टाकलेल्या भागावर गतिरोधकासारखा माती, खडीचा उंचवटा भराव टाकून रस्ता बुजवून टाकत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या उंचवट्या भागामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी अडून ते मुख्य शिळफाटा रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत आहे. असा प्रकार सुयोग हाॅटेल समोरील रिजन्सी अनंतम भागत डोंबिवलीत प्रवेश करतानाच्या ठिकाणी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस या कंपनीच्या ठेकेदाराला भूमिगत केबल वाहिनीवर टाकलेला उंचवटा समतल करण्याची मागणी करत आहेत. या उंचवट्यामुळे पावसाचे पाणी अडून सुयोग हाॅटेल परिसर जलमय होत आहे. डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या, शिळफाटा रस्त्यावरील वाहनांना पाण्यातून वाट काढत जावे लागते, अशा तक्रारी करूनही गवार कंपनीचा ठेकेदार दाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत.

गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला त्यावेळी आणि आताही रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील रस्ता केबल वाहिनीवरील उंचवट्यामुळे पाणी अडून जलमय होत आहे. हे उंचवटे अनेक ठिकाणी माती, खडी टाकून बुजविले आहेत. पाऊस सुरू झाला की खडीवरील माती वाहून जाते आणि खडीवर वाहने घसरण्याच्या घटना घडतात. या तुंबलेल्या पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागात वाहतूक कोंडी होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागीचे पत्रे वाहनांना अडथळा येत आहेत.