कल्याण : कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड ) भागात वीस वर्षापूर्वी नागरिकांची गरज ओळखून संत सावता माळी भाजी मंडईची उभारणी कल्याण डोंबिवली पालिकेकडून करण्यात आली. तळ आणि एक मजल्याच्या या मंडईत सुरुवातीच्या काळात भाजी विक्रेते बसत होते. आता भाजी मंडईचे रुपांतर व्यापारी संकुलात झाले आहे. या मंडईच्या वास्तुत लग्न आणि इतर कार्यासाठी सभागृह (हाॅल) आणि भाजी ओटे धारकांनी भाजी विक्री ओट्यांचे रुपांतर व्यापारी गाळ्यांमध्ये केले आहे.

भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील जागेत भाजी मंडई कल्याण डोंबिवली पालिकेने उभारली. यापूर्वी या जागेत एक भव्य व्यापारी दुकान सुरू करण्यात आले. त्यानंतर हळूहळू भाजी ओटे धारकांनी मंडईतील ओटे तोडून तेथे व्यापारी गाळे तयार केले. ते गाळे व्यापारी दराने व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, आस्थापनांना भाड्याने दिले आहेत. कर्णिक रोड संतोषी माता रस्त्यावरील या भाजी मंडईत व्यापारी गाळे, लग्न आणि इतर समारंभांसाठी हाॅल सुरू करण्यात आल्याने माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी यासंदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भाजी मंडईत सुरू करण्यात आलेली व्यापारी दुकाने, आस्थापना, लग्नाच्या हाॅल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी कुलकर्णी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

या भाजी मंडईमधील बहुतांशी गाळे काही माजी नगरसेवक, नगरसेविकांनी आपल्या कार्यकर्ते, नातेवाईक, कार्यालय, घरातील कामगार यांच्या नावे घेतले आहेत. पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या तत्कालीन उपायुक्तांनी भाजी मंडईतील ओटेधारक आणि पालिकेबरोबर केलेले करार नोंदणीकृत केलेले नाहीत. करार कागदपत्रांमध्ये साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पण ओटेधारक (गाळेधारक) मालकांची मूळ नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमधून दिसून येत आहे.

या भाजी मंडईतील ३०१ व्यापारी गाळेधारक पालिकेचा मालमत्ता कर, भाडे भरत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. बहुतांशी ओटेधारकांचे मूळ मालक हे माजी नगरसेवक असल्याने या राजकीय दबावामुळे पालिका अधिकारी या भाजी मंडईतील व्यापारी वापराविषयी आक्रमक भूमिका घेत नाही, असे तक्रारदार मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. या मंडईतील भाजी ओटे, व्यापारी गाळे यांचे दस्त नोंदणीकरण झालेले नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. पालिकेला व्यापारी गाळेधारकांकडून मालमत्ता कर, भाडे मिळत नसल्याने पालिकेचा महसूल बुडत आहे. या मंडईत पालिकेच्या मालमत्ता विभागाने बॅन्क्वेट हाॅल सुरू करण्यास दिलेली परवानगी नियमबाह्य आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाच्या चौकशीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आदेश देऊन संत सावळा माळी भाजी मंडईच्या माध्यमातून बुडणाऱ्या महसुलाची, व्यापारी संकुलाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी तक्रारदारासह परिसरातील जाणकार नागरिकांकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्त तक्रारीप्रमाणे याप्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.रमेश मिसाळ उपायुक्त, मालमत्ता.