डॉ.गंगाधर परगे, ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी

मुंबई शहरालगत ठाणे ग्रामीण भाग वसला असला तरी पुरेशी आरोग्य यंत्रणा इथे नाही. तरीही करोनाकाळात जिल्हा परिषदेने नियोजनपूर्वक करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद आरोग्य विभागाचाच आधार आहे. ही यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.  नुकताच हा विभाग नुकताच जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.गंगाधर परगे यांच्या हाती आला आहे.  त्यांच्याशी जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी बातचीत केली असता त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

  • ठाणे जिल्ह्याची करोना परिस्थिती काय ?

ठाणे जिल्ह्यात सद्य:स्थितीला करोनाची लाट ओसरताना दिसत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर जिल्ह्यातील रुग्ण संख्येत घट होताना दिसून आली. पूर्वी दिवसाला सात हजार ते आठ हजार रुग्ण आढळून येत होते. आता ३०० हून कमी रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब सकारात्मक आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार सक्रिय रुग्ण असून यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. ग्रामीण भागामध्येसुद्धा असेच चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पाच तालुक्यात उपलब्ध असलेल्या करोना काळजी केंद्रांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. जानेवारी महिन्यात १७ ते १८ टक्के असलेला लागण दर सध्या ५ ते ७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव ओसरत असला तरी नागरिकांनी सतर्क राहून करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

  •    नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत ?

ठाणे जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांची ७४ लाख, ९७ हजार, ५९६ इतकी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. कोविनवरील लसीकरणाच्या माहितीनुसार  ६८ लाख ११ हजार २८२ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा, तर ५५ लाख ६९ हजार ४७१ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर, ६ लाख ८६ हजार ३१४ नागरिकांनी अद्याप लशीची पहिली मात्राही घेतलेली नाही. या नागरिकांचे लसीकरणही लवकरात लवकर करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना लसीकरणाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यासह, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या समन्वय व सहकार्याने करोना लसीकरण वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत.  दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना दुसऱ्या मात्रेच्या तारखेबाबत अवगत करण्यासाठी मदत कक्ष सुरू करून दूरध्वनी संदेश देण्यात येतो. शालेय विद्यार्थीद्वारा पालकांना करोना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पत्र देऊन संदेश दिला जातो.

  •   जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे?

ठाणे ग्रामीण भागातील नागरिकांना ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८० उपकेंद्रे, पाच प्राथमिक आरोग्य पथके, तीन जिल्हा परिषद दवाखाने आणि नवसंजीवनी कार्यक्रमांतर्गत ४ भरारी पथके असून यांच्या मार्फत उपलब्ध विविध आरोग्यसेवा देण्यात येतात. तसेच आदिवासी पाडय़ातील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी विविध आरोग्यसेवा देण्यात येतात. 

  •   यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी काही तरतूद करण्यात येणार आहे का?

 जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नेहमीच आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली जाते. यंदाही चांगला निधी आरोग्य विभागासाठी मिळेल असा विश्वास आहे. जिल्हा परिषद सेसमधून सोनोग्राफी तपासणी या अभिनव योजनेसह इतरही काही योजनांचा समावेश अर्थसंकल्पात असणार आहे. सध्या ग्रामीण भागात ९ उपकेंद्र इमारतींचे बांधकाम सुरू आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणीही सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्तावित आहे. त्यासह, २०११च्या लोकसंख्येवर आधारित बृहद् आराखडय़ामध्ये नवीन १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५७ उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

  •   आरोग्य विभागाबाबत तुमचे प्राधान्य कशाला असेल?

 ग्रामीण भाग विस्ताराने मोठा आहे. पाच तालुक्यांमध्ये शहापूरसारखा तालुका आदिवासीबहुल भागाने व्यापला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर राहील. प्राथमिक केंद्र, उपकेंद्र स्तरावर विविध उपकरणांनी सज्ज राहतील यासाठी प्रयत्न राहील. करोनाचे संकट अजून आहेच, त्यासंदर्भातही सर्व प्रकारची खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविणे  यासाठी प्रयत्नशील असू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

     मुलाखत : पूर्वा साडविलकर