ठाणे – ठाणे स्थानक परिसराजवळील मुख्य बाजारपेठेत असलेल्या तहसीलदार कार्यालयाचा पूनर्विकास केला जात असल्यामुळे हे कार्यालय ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतू, तहसील कार्यालय स्थलांतरित झाल्यामुळे या कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ आणि दाखले घेण्यसाठी नागरिकांना आता, पायपीट करावी लागणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेल्या मुख्य बाजारपेठेत ठाणे तहसीलदार कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या दोन्ही कार्यालयांच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे त्यांच्या एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि तहसील कार्यालयाचे स्थलांतर तात्पुरत्या स्वरुपात ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील सातव्या मजल्यावर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
या तहसील कार्यालयामार्फत विधवा महिलांसाठीची योजना, श्रावणबाळ योजना, सेतू मार्फत अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला यांसह शासनाच्या विविध योजनांच्या लाभ आणि दाखले नागरिकांना मिळतात. त्यामुळे या कार्यालयात दररोज सकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. स्थानक परिसराजवळ कार्यालय असल्यामुळे नागरिकांना या कार्यालयात येणे सोयीस्कर पडत असत. परंतू, पूर्नविकासाच्या कामामुळे कार्यालय पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे तहसील कार्यालय गाठताना आता नागरिकांची दमछाक होणार आहे.
– जिल्हाधिकारी कार्यालयात योजनांचा विभाग सुरू ठेवावा
तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, क्रिमिलेअर दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक दाखला, संजय निराधार गांधी योजनेचे दाखले असे विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे नागरिक दिवसभर तहसील कार्यालयात येत असतात. त्यामुळे या दाखल्यांचे विभाग ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु ठेवावे, अशी मागणी काही नागरिकांकडून होऊ लागली आहे.