ठाणे : पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वृक्षांची पडझड होऊन जीविताला धोका पोहोचण्याची मानवी भीती गुरुवारी पक्ष्यांच्या जिवावर उठली. घोडबंदर येथील एका गृहसंकुलाजवळील रस्त्यावरील झाडाची छाटणी सुरू असताना फांद्यांवरील काही घरटी जमिनीवर कोसळून डोमकावळा तसेच बगळ्यांच्या ४५ पिल्लांचा मृत्यू झाला. यावरून पक्षीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाणे महापालिकेने वृक्षछाटणी ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
निसर्गसंपन्न अशा घोडबंदर परिसराला गेल्या काही वर्षांत सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचे स्वरूप लाभू लागले आहे. मानवी ‘आक्रमणामुळे’ या परिसरातील पक्षी-प्राणिसंपदा आधीच संकटात सापडली आहे. त्यातच गुरुवारच्या घटनेने मानवी असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या परिसरात असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या आणि उंच झाडांवर असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांचे अधिवास आहेत. मात्र, याची तमा न बाळगता करण्यात आलेल्या वृक्षछाटणीमुळे पक्ष्यांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यातील पडझडीचीशक्यता गृहीत धरून महापालिकेमार्फत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते. तसेच गृहसंकुले आणि कंपन्यांच्या आवारातील फांद्यांची छाटणी करण्याचे आदेशही देण्यात येतात. त्यानुसार, आनंदनगर भागातील ऋतू एनक्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असताना काही फांद्यांवरील डोमकावळा आणि बगळा यांसह अन्य प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी खाली कोसळली. त्यात घरट्यात असलेली अनेक चिमुकली पिले रस्त्यावर आणि गटारात पडून मरण पावली. पक्ष्यांची काही अंडीही फुटून रस्त्यावर पसरली.
काही नागरिकांनी याबाबत मायपलक्लब फाऊंडेशनच्या आदिती नायर यांना ही माहिती कळवली. त्यानंतर या संघटनेच्या पक्षीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना २८ पक्षी आणि त्यांची पिल्ले जखमी अवस्थेतही आढळली. या सर्वांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
वृक्षतोडीत पक्ष्यांचा सर्रास बळी
गेल्या काही वर्षांत विविध विकासकामांसाठी झाडे तोडणे किंवा ती ‘स्थलांतरित’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वेगळ्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्यात येते. मात्र, हे सगळे होत असताना पूर्वीच्या झाडांवर वास्तव्याला असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचा विचारच केला जात नसल्याचा पक्षीप्रेमींचा आरोप आहे.
ठेकेदाराविरोधात पोलीस तक्रार
दरम्यान यासंदर्भात पालिकेकडे संपर्क केला असताना गृहसंकुलाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत वृक्षछाटणीचे काम सुरू होते, असे सांगण्यात आले. मात्र, हा प्रकार गंभीर असल्याने ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांनी सांगितले.