ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात महिलेला पकडून तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने प्रतिकार केल्याने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी राजन सिंह (३९) याला अटक केली आहे. या घटनेनंतर दिवा शहरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलेची ओळख पटली नसल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ आणि ८ वर सफाई कर्मचारी शुक्रवारी पहाटे सफाई करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ५ आणि ६ वर आरडा-ओरड सुरु असल्याचे त्यांनी पाहिले. महिला आणि पुरुषामध्ये वादाचा प्रसंग सुरु होता. त्या व्यक्तीने महिलेला दोन्ही हातांनी गळ्याभोवती समोरील बाजूने पकडले होते. महिला त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. महिला प्रतिकार करत असल्याने त्या व्यक्तीने तिला एका धावत्या मालगाडीखाली ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो व्यक्ती रेल्वे रुळांवरुन चालत जात होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती दिवा रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव राजन सिंह असल्याचे सांगितले. राजन हा दिवा शहरात राहतो. त्याने महिलेचा रेल्वे स्थानकात पाठलाग करुन तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. राजन हा महिलेला ओळखत नसून तिची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी राजन विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.