बदलापूर : आपल्या मृत पतीच्या नावे बँकेत असलेली विमा रक्कम ही कंपनीच्या आयपीओ मध्ये वळवण्यात आली आहे. त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली वेळोवेळी विविध कारणे सांगून एका महिलेची ५४ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. विशेष म्हणजे घरातल्यांना अंधारात ठेवून महिला शिक्षिकेने केलेला हा प्रकार मुलीच्या लक्षात आला. त्यानंतर याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पूर्व भागातील कात्रप परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीने निधन झाल्याने त्यांच्या विम्याचे पैसे पतीच्या बँक खात्यात जमा होते. नोव्हेंबर २०२४ पासून अनिल नागर नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला सातत्याने फोन करून तुमच्या पतीची बँकेत असलेली विमा रक्कम कंपनीच्या आयपीओ मध्ये वळवण्यात आल्याचे सांगितले. इतकेच नाही तर या विम्याच्या पोटी ३ लाख रूपयांतून ८० लाख रूपयांचा परतावा देतो, असेही अमिष महिलेला दाखवले. महिला या अमिषाला बळी पडत असल्याचे कळताच आरोपीने सातत्याने विविध टप्प्यांवर महिलेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. कधी सिविल प्रक्रियेसाठी, कधी ना हरकत दाखल्यासाठी तर कधी वारसदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी या आरोपीने महिलेकडून पैसे उकळले. डी मॅट खाते उघडण्यासाठीही पैसे लागतील असेही या आरोपीने महिलेला सांगितले होते.
या सर्व पैशांसाठी महिलेने आरोपीला तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून ५४ लाख ७४ हजार ५८९ रुपये वळते केले. विशेष म्हणजे संबंधित महिलेने आपल्या कुटुंबियांपासून हा संपूर्ण व्यवहार लपवून ठेवला. मात्र या व्यवहाराची कुणकुण महिलेच्या मुलीला लागल्यानंतर तिने आपल्या आईला जाब विचारला. त्यावेळी महिलेने सर्व प्रकार आपल्या मुलीला सांगितला. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे दिसून आल्यानंतर महिलेने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात आरोपी अनिल नागर यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करत आहेत.
जनजागृती नंतरही फसवणूक
शेअर बाजार, गुंतवणूक, मोठा परतावा अशी अनेक अमिषा दाखवून फोनद्वारे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरू आहे. यात फसवणूक होऊ नये म्हणून पोलिस, प्रशासन सातत्याने नागरिकांना जागरूक करत असते. मात्र त्यानंतरही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये कुटुंबियांना विश्वासात घेऊन व्यवहार करण्याचे आणि विश्वासार्ह माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला यातील तज्ञ मंडळी देतात.
गेल्या आठवड्यात असाच प्रकार
गेल्या आठवड्यात बदलापूर येथील बॅंक कर्मचारी असलेल्या महिलेची अशाच पध्दतीने सायबर चोरांच्या अमिषाला बळी पडत ४१ लाखांची फसवणुक झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व फसवणुकीच्या प्रकरणात उच्च शिक्षित व्यक्तींची संख्या अधिक असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.