कल्याण- शहापूर जवळील आसनगाव रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटेची लोकल पकडताना एक महिला प्रवासी मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गात उभ्या असलेल्या मालगाडी खालून जात होती. त्याचवेळी मालगाडी सुरू झाली. गाडी महिलेच्या हात, पायावरुन गेल्याने महिलेच्या हात, पायाला गंभीर दुखापती झाली आहे. या महिलेला तातडीने मुंबईत शीव येथील रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

आसनगाव येथे राहणाऱ्या विद्या वाखारीकर (५३) या मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात परिचारिका आहेत. दररोज त्या नोकरी निमित्त आसनगाव ते शीव लोकलने प्रवास करतात. शनिवारी रुग्णालयात सकाळचे कर्तव्य असल्याने परिचारिका वाखारीकर कसाऱ्याहून आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे ४.२८ मिनिटांनी येणाऱ्या कसारा लोकलने मुंबईत जात होत्या. अंधार आणि पाऊस असल्याने विद्या वाखारीकर यांना त्यांचा मुलगा रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी आला होता.

हेही वाचा >>> ठाणे शहरात रविवारपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा

आसनगाव रेल्वे स्थानकातील फलाटावर जाण्यासाठी पूर्व भागात एक पादचारी पूल आहे. तो आडवळणी आहे. वळसा घालून जाण्यापेक्षा आपण रेल्वे मार्गावर थांबून असलेल्या मालगाडी खालून फलाटावर झटपट जाऊ म्हणून वाखारीकर या मालगाडी खाली शिरल्या. तेवढ्यात मालगाडी सुरू झाली. वखारीकर यांचा हात, पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार पाहताच मुलाने ओरडा केला. त्याचा उपयोग झाला नाही. गंभीर जखमी वाखारीकर यांना तातडीने शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्या शुध्दीवर आहेत. उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या ज्येष्ठ सल्लागार अनिता झोपे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा भाजपमध्ये रविंद्र चव्हाण यांची ताकद वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसनगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या हिताचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधले आहेत. त्यामुळे प्रवासी या आडमार्गी वळण पादचारी पुलांपेक्षा रेल्वे मार्गातून मधला मार्ग म्हणून जाणे पसंत करतात. आसनगाव रेल्वे स्थानकात पश्चिमेला उतरणारा कसारा बाजूकडील स्कायवाॅक सहा वर्षापासून रखडला आहे. पूर्व-पश्चिम येजा करण्यासाठी स्थानकात जिना नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. आसनगाव रेल्वे स्थानकात गृह फलाट उभारणीचे नियोजन रेल्वेचे आहे. तेही रखडले आहे, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी सांगितले. काही दुर्घटना घडेल तेव्हाच रेल्वे प्रशासन उपाय योजना करणार आहे का. या भागातील खासदार, आमदारांनी आसनगाव रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे. ३५ वर्षापूर्वी मालगाडी अंगावरुन जाऊन एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आसनगाव रेल्व स्थानकात प्रवाशांनी आठ तास आंदोलन केले होते. या प्रकरणात तत्कालीन खा. दिवंगत प्रकाश परांजपे यांनी हस्तक्षेप केल्याने आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर आसनगावचे तत्कालीन सरपंच झोपे आणि ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे आसनगाव रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली, असे झोपे यांनी सांगितले.