डोंबिवली – सकाळच्या वेळेत ७.४०, त्यानंतरची ८.४० वाजता येणाऱ्या डोंबिवली लोकल मुंब्रा, दिवा, कोपर भागातील प्रवाशांनी उलट मार्गाने भरून येतात. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीच डोंबिवली लोकल बाहेरच्या प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. स्थानिक प्रवाशांसाठी हक्काच्या असलेल्या डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीतील प्रवासी आता उपरे झाले आहेत. त्यामुळे या विषयावर प्रभावी मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या ३०० हून अधिक नोकरदार महिलांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

सकाळी ८.१४ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकातून सुटणारी डोंबिवली सीएसएमटी लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेच्या अर्धा तास अगोदर पोहचते. त्यामुळे बहुतांशी नोकरदारांची डोंबिवली लोकलला पसंती असते. कर्जत, कसारा, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा भागातून प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलने प्रवास करण्यापेक्षा प्रवासी डोंबिवली लोकलमध्ये बसायला आणि सुस्थितीतपणे उभे राहण्यास जागा मिळते म्हणून पसंती देतात.

मागील काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून येणारी सकाळच्या वेळेतील डोंबिवलीतील लोकल मुंब्रा, दिवा, कोपर भागातील प्रवाशांनी उलट मार्गातून भरून येतात. हे प्रवासी अगोदरच आसनावर बसून येत असल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात चढणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली लोकल असुनही अलीकडे डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. लोकल डब्यांमध्ये तीन डबे महिलांसाठी राखीव असतात. अलीकडे हे तिन्ही डबे मुंब्रा ते कोपर भागातील रेल्वे स्थानकातून उलट मार्गिकेतून बसून येणाऱ्या महिला प्रवाशांनी भरलेले असतात, अशा तक्रारी नोकरदार महिला प्रवाशांनी केल्या आहेत.

उलट मार्गिकेतून आलेल्या या महिला प्रवासी डोंबिवली ते ठाणे, घाटकोपर ते सीएसएमटीच्या दरम्यान प्रवास करतात. या कालावधीत या महिला आपले उतरण्याचे रेल्वे स्थानक येईपर्यंत आसनावर बसून असतात. अनेक जाणते प्रवासी बसून अर्धा पाऊण तास झाला की समोर उभ्या असलेल्या प्रवाशाला बसण्यास जागा देतात. हे उलट मार्गिकेतून बसून येणारे प्रवासी अजिबात सौजन्याने बसण्यास जागा देत नाहीत, अशा तक्रारी डोंबिवलीतील महिला प्रवाशांनी केल्या आहेत.

यापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणारी सकाळची ७.५६ ची लोकल उलट मार्गिकेतून जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली असायची. यासंदर्भात कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी, रेल्वे संघटनेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर सकाळची कल्याण लोकल कारशेडमधून सोडण्यात येऊ लागली. आणि या लोकलमधील उलट मार्गिकेतून येणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी झाला. त्याप्रमाणे डोंबिवली लोकल कारशेड मधून काढण्यात यावी, अशी सूचना या महिला प्रवाशांनी केली आहे.या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी अन्यथा डोंबिवलीतील महिला प्रवासी आणि उलट मार्गिकेतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये जोरदार वाद होऊन हा विषय चिघळेल, अशी शक्यता या महिलांनी वर्तवली आहे.

सकाळच्या वेळेतील डोंबिवली लोकलमधील काही डबे उलट मार्गिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी निश्चित करावेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना डब्यात बसण्यास जागा मिळेल. यापूर्वी असे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात यशस्वी झाले आहेत. यासाठी आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी पुढाकार घ्यावा. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.