जागतिक महिलादिनी मीरा-भाईंदर महापालिकेचा उपक्रम; विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा सत्कार
जागतिक महिलादिनी गरजू महिलांना अबोली रिक्षा देण्याची घोषणा मीरा-भाईंदर महापालिकेने केली होती. या घोषणेनुसार गुरुवारी आठ महिलांना अबोली रिक्षा दिल्या जाणार आहेत. याच दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या १२ महिलांचा सत्कारही करण्यात येणार असून यात हिंदी सिनेसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांचा समावेश आहे.
शहरातील गरजू तसेच विधवा महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी १०० महिलांना रिक्षा देण्याची योजना महापौर डिम्पल मेहता यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. या योजनेतून सध्या २५ महिला रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. यातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आठ महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अबोली रिक्षा दिल्या जाणार आहेत.
रिक्षेची एकंदर किंमत १ लाख ७५ हजार रुपये इतकी असून सध्या ही पूर्ण रक्कम महापालिकेने अदा केली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने १० रिक्षा खरेदी केल्या आहेत. सध्या लाभार्थी महिलांकडून प्रशिक्षण, परवाना यासाठी येणारा २५ हजार रुपयांचा खर्च महापालिकेने घेतला आहे.
रिक्षाखरेदीची रक्कम सध्या महापालिकेने आपल्या खिशातून खर्च केली असली तरी लाभार्थी महिलांना त्या मोफत दिल्या जाणार नाहीत. रिक्षेच्या १ लाख ७५ हजार रुपयांच्या रकमेपैकी काही रक्कम महानगरपालिकेकडून अनुदान म्हणून दिली जाणार असून उर्वरित रकमे इतके कर्ज लाभार्थी महिलांना मिळवून दिले जाणार आहे. मात्र अनुदानाची रक्कम किती असावी हे अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती महिला बालकल्याण सभापती शानू गोहिल यांनी दिली.
कुणाला लाभ?
आठवी उत्तीर्ण असलेल्या २० ते ४५ या वयोगटांतील तसेच मीरा-भाईंदरमध्ये किमान १० वर्षे आणि राज्यात १५ वर्षे वास्तव्य असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी महिलेला देण्यात येणारी रिक्षा सात वर्षे महानगरपालिकेच्या नावावर असणार आहे. तोपर्यंत ही रिक्षा लाभार्थ्यांला विकता येणार नाही, तसेच रिक्षा स्वत: महिलेला चालवावी लागणार आहे.
या महिलांचा सन्मान
- एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीची नायिका म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री झीनत अमान
- कर्तव्यदक्ष महिला पोलीस नाईक वैष्णवी विनायक यंबर
- डॉक्टर राखी अगरवाल
- राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर तिरंदाजी स्पर्धेत पदक मिळवणारी जिविधा पटेल
- कोरियन कराटे चॅम्पियन आणि मीरा-भाईंदर महापालिका शाळेची विद्यार्थिनी निधी यादव
- राज्यस्तरीय फुटबॉल खेळाडू प्रियंका अहिरराव
- राज्यस्तरीय मार्शल आर्ट खेळाडू सुविधा कदम
- कवयित्री शोभा गांगण
- सलग सहा वेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या वरिष्ठ नगरसेविका प्रभात पाटील
- महानगरपालिकेच्या ज्येष्ठ अधिकारी मंजिरी डिमेलो.