डोंबिवली- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील काही वास्तुविशारदांच्या आस्थापनांमध्ये आतील दालनात केरळ, तमीळनाडू भागातून आलेले आरेखक कार्यरत असतात. हे आरेखक स्थळपाहणी न करता विकासकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बसल्या जागी इमारतीचा कोणतेही नियोजन नसलेला इमारतीचा आराखडा तयार करतात. हा आराखडा सुयोग्य आणि अंतीम समजून त्यावर काही नोंदणीकृत वास्तुविशारद स्वाक्षऱ्या मारतात, अशी धक्कादायक माहिती कल्याण, डोंबिवलीत अनेक वर्ष व्यावसायिक मूल्य जपत वास्तुविशारद म्हणून काम करणाऱ्या काही मोजक्या ज्येष्ठ वास्तुविशारदांनी दिली.

हेही वाचा >>> उल्हासनगरात पालिका उभारणार संक्रमण शिबीर; १२ इमारतीत २७० सदनिकांचा प्रस्ताव, २० कोटींचा खर्च

अशाप्रकारे चुकीचा इमारत बांधकाम आराखडा तयार केल्याबद्दल संबंधित आरेखक कार्यरत असलेल्या आस्थापनेला विकासकाकडून मोठी रक्कम मिळते. या चुकीच्या इमारत आराखड्यावर अंतीम मंजुरीची स्वाक्षरी, शिक्का मारणाऱ्या नोंदणीकृत वास्तुविशारदाला २५ ते ३० रुपये शुल्क मिळते, असे या वास्तुविशारदांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात आपण केलेल्या नियमबाह्य इमारत आराखड्यामुळे शहराचे नियोजन बिघडते. परिसरातील इमारत, रस्ते, गटार, पाण्याची, मल टाकीला धोका निर्माण होऊ शकते. वाहनतळ इमारतीत राखीव न ठेवल्याने तेथील २५ ते ३० कुटुंबाची वाहने रस्त्यावर उभी राहून वाहतुकीला अडथळा येऊ शकतो, याचे कोणतेही भान दालनातील आरेखक करत नाहीत. गुंतवणूकदार, विकासकाला इमारत बांधण्याची घाई असल्याने, काही वेळा बेकायदा इमारत ठोकायची असल्याने असे आराखडे खूप महत्वाचे काम करतात. या इमारत आराखड्यावर आणि सोबतच्या बोगस कागदपत्रांच्या साह्याने काही विकासक, माफिया बँकांमधून घर खरेदीदारांना कर्ज मिळवून देतात. डोंबिवलीत हा प्रकार सध्या जोरात आहे, अशी माहिती या व्यवहारातील काही माहितगारांनी दिली.

हेही वाचा >>> कल्याणमधील उंबर्डे येथील कचराभूमीवरील सुरक्षारक्षकांना गुंडांची मारहाण

वास्तुविशारदांच्या कार्यालयांमधील केरळ, तमीळनाडू भागातून प्रशिक्षण घेऊन आलेले अनेक आरेखक वास्तुविशारद म्हणून शहरात मिरवतात. या परप्रांतीय आरेखकांची चौकशी ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात झाली तर आरेखकांच्या माध्यमातून झालेला मोठा बांधकाम घोटाळा उघड होण्याची शक्यता काही वास्तुविशारदांनी व्यक्त केली. नोंदणीकृत वास्तुविशारदाचा भागीदार हाही नोंदणीकृत वास्तुविशारदच असला पाहिजे. असा केंद्रीय कायदा आहे. वास्तुविशारद नसलेले काही जण वास्तुविशारद आस्थापना (फर्म) चालवितात. या कार्यालयात तयार होणाऱ्या इमारत आराखड्यावर मंजुरीची स्वाक्षरी, शिक्का मारण्याचा अधिकार नोंदणीकृत वास्तुविशारदांना नाही, तरीही काही वास्तुविशारद २५ ते ३० हजाराच्या शुल्कासाठी असे प्रकार करतात, अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील काही जाणकारांनी दिली. हे आराखडे पालिकेत दाखल करुन नगररचना अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन मंजूर केले जातात.

उद्वाहन नियमबाह्य चुकीचे इमारत बांधकाम आराखडयांनी उभारलेल्या सातहून अधिक माळ्याच्या बेकायदा इमारतींना शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उद्वाहन मंजुरीची परवानगी मिळते. बांधकाम विभागातील अधिकारी त्या इमारतीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता. कागदपत्रांची सत्यता, पडताळणी न करता भूमाफिया, विकासक यांच्या हातमिळवणी करुन बेकायदा इमारतीमधील उद्वाहनला परवानगी देतात. कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक बेकायदा इमारतींमध्ये उदवाहन दिसत आहेत, अशी माहिती एका जाणकाराने दिली. या बेकायदा इमारतींचे बांधकाम निकृष्ट असते. या इमारतीमधील उद्वाहनची देखभाल नियमित केली जात नाही. त्यामुळे अपघाताची भीती आहे. या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अनेक विकासक, वास्तुविशारदांनी केली. याविषयी उघडपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला.