कल्याण – विवाह करण्यासाठी कल्याणमधील एक तरूण मनपसंत तरूणीच्या शोधात होता. ऑनलाईन वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून उपवर वधूचा शोध घेत असताना, तरूणाला शादी डाॅट काॅम या वधू वर सूचक मंडळाच्या ऑनलाईन व्यासपीठावर एका तरूणीशी ओळख झाली. या तरूणीने कल्याणमधील तरूणा बरोबर ओळख वाढवून, लग्न करण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडून गेल्या दोन महिन्यात गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाख ८० हजार रूपये उकळून आर्थिक फसवणूक केली आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात राहत असलेला हा ३५ वर्षाचा तक्रारदार तरूण दुध पुरवठ्याचा व्यवसाय करतो. या तरूणाच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी आयसी मार्केट कस्टमर सर्व्हिस या टेलिग्राम निगडित कंंपनीतील अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मार्च ते एप्रिल या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार शादी डाॅट काॅम या ऑनलाईन व्यासपीठावर घडला आहे.

तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण विवाहासाठी सुयोग्य मुलीच्या शोधात आहोत. विविध वधू, वर सूचक मंडळांच्या माध्यमातून उपवर तरूणीचा शोध घेत असताना आपणास शादी डाॅट काॅम या वधू वर सूचक मंडळाच्या ऑनलाईन व्यासपीठावर दिव्यानी अग्रवाल या तरूणीशी ओळख झाली. हे दोघे तरूण, तरूणी नियमित संपर्कात राहू लागले. तरूणीने तक्रारदार तरूणाला आपण तुमच्या बरोबर लग्नासाठी इच्छुक आहोत. लवकरच आपण लग्न करू, अशा आणाभाका तरूणीने घेतल्या.

विवाहासाठी इच्छुक तरूणीने तरूणाचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित तरूणीने तरूणाला फाॅरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करून डाॅलरमध्ये आपणास नफा मिळवून देते असे आमिष दाखविले. होणारी पत्नी आपणास गुंतवणुकीतून नफा मिळवून देते म्हणून तरुणाने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तरूणीने गुंतवणुकीची तयारी दर्शविल्यावर दिव्यानी अग्रवाल हिने तरूणाला आयसी मार्केट व्हिआयपी नावाची जुळणी पाठवली. ती स्वताच्या मोबाईलवर स्थापित करण्यास सांगितली. त्यानंतर तरूणीने तक्रारदार तरूणाच्या नावाने एक गुंतवणूक व्यवहारासाठी ऑनलाईन जुळणी उघडली. तरूणीने तरूणाला आयसी मार्केट कस्टमर सर्व्हिसेसच्या नियंत्रकाशी संपर्क करण्यास सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियंत्रकाने तरूणाला टप्प्याने त्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर रक्कम पाठविण्यास सांगितले. तरूणाची बँक व्यवहाराची सर्व माहिती तरूणीने स्वताच्या ताब्यात नियंत्रकाच्या माध्यमातून घेतली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत तरूणाने या गुंतवणूक योजनेत एकूण ३९ लाख ८० हजार रूपये टप्प्याने गुंतवले. त्यानंतर तरूणाने तरुणीला आकर्षक परतावा देण्याची मागणी, तसेच विवाह कधी करायचा अशी विचारणा सुरू केली. तरूणीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. तरूणीने तक्रारदाराच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. तरूणीने आपल्या बरोबर विवाह नाहीच केला, उलट आपल्याजवळील ३९ लाखाची रक्कम ऑनलाईन माध्यमातून लुटली. याची खात्री पटल्यावर तरूणाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड याप्रकरणाचा तपास करत आहेत.