ठाणे : भिवंडी येथील रांजनोली भागात अवजड वाहनाच्या धडकेत कल्याणच्या ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल खामकर असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण येथील पिसवली गावात राहुल खामकर हे त्यांची पत्नी आणि मुलीसोबत वास्तव्यास होते. भिवंडीतील दापोडे भागातील एका गोदामामध्ये ते चालक म्हणून काम करत.
१९ ऑक्टोबरला रात्री राहुल यांची पत्नी त्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांनी राहुल यांच्या भावाला याबाबतची माहिती दिली. राहुल यांच्या भावाने मोबाईलवर संपर्क साधला असता, मोबाईल क्रमांकावरुन पोलीस बोलू लागले. पोलिसांनी राहुल यांच्या भावाला सांगितले की राहुल यांचा अपघात झाला असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
राहुल यांचे कुटुंबिय तात्काळ तेथील रुग्णालयात गेले. परंतु त्यापूर्वीच डाॅक्टरांनी राहुल यांना तपासून त्यांना पुढील उपचारासाठी भिवंडीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राहुल यांचे कुटुंबिय सरकारी रुग्णालयात पोहचले असता, तेथे गर्दी जमली होती. राहुल यांच्या भावाला प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, १९ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता त्यांना एका लॉरी या भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिली.
त्यामुळे ते दुचाकीवरुन खाली पडून त्यांना रक्तस्त्राव झाला. त्यांना कारमधून रुग्णालयात आणल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले. या अपघातात राहुल यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राहुल यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अवजड वाहन मालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.