ठाणे : काही तरुणांच्या हातामध्ये दुचाकी आल्यानंतर त्यांच्यामधील ‘मस्ती’ जागी होते. मुंब्रातील रस्त्यावर देखील असाच एक तरुण दुचाकी चालविताना स्टंटबाजी करत होता. दुचाकी चालविताना उभे राहून नाचणे, आसनावर पाय ठेवणे, लाथा मारण्याचा प्रयत्न करणे असे विचित्र प्रकार त्याच्याकडून सुरु होते. परंतु त्याच्या मागे पोलीस येत आहेत ही त्याला कल्पना नव्हती. पोलिसांनी त्याला स्टंटबाजी करताना हातोहात पकडले. त्यानंतर काय झाले तुम्हीच पहा…काही तरुणांच्या हातात दुचाकी काय आली, की त्यांच्या मनात ‘रस्ते माझेच आहेत’ असा चुकीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
नियम, शिस्त आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा विसर पडतो. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात घडला आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवर धोकादायक स्टंटबाजी करताना दिसून आला. एवढंच नाही, तर दुचाकीवर बसून तो लाथा मारण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही तासांतच त्या बेफाम स्टंटबाज तरुणाला हातोहात पकडण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. त्याच्या दुचाकीची तपासणी करून चालान करण्यात आले, आणि भविष्यात अशा प्रकारची कृती पुन्हा केल्यास कडक कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही दिला.
व्हिडीओमध्ये काय दिसते…
मुंब्रा येथील एम.एम. व्हॅली परिसरात पोलीस शिपाई गंगावणे आणि घुले हे २ नोव्हेंबरला गस्ती घालत होते. त्यावेळी एक तरुण त्याच्या दुचाकीवर धोकादायकरित्या स्टंटबाजी करत होता. दुचाकी चालवताना प्रवाशांना लाथा मारताना दिसत होता. तर कधी दुचाकी चालविताना उभा राहून नाचत होता. तर कधी आसनावर पाय ठेऊन, तिरपे बसून वाहन चालवित होता. त्याला माहित नव्हते की त्याच्या मागोमाग दोन पोलीस कर्मचारी दुचाकीने गस्ती घालत होते. स्टंटबाजाला पोलिसांनी तेथेच रोखले. त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर ‘योग्य’ कारवाई करण्यात आली. सध्या त्याचा आधीचे स्टंटबाजी आणि नंतरचा माफीनामा समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित होत आहे.
मुंब्रातील रस्त्यावर तरुण दुचाकी चालविताना स्टंटबाजी करत होता. दुचाकी चालविताना उभे राहून नाचणे, असे विचित्र प्रकार त्याच्याकडून सुरु होते.https://t.co/r9t7R9OJUe#BIKe #Mumbra #Road pic.twitter.com/CRajD1wJWr
— LoksattaLive (@LoksattaLive) November 5, 2025
ठाणे पोलिसांकडून कारवाई…
ठाणे पोलिसांनीही या प्रकरणाचे चित्रीकरण त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर प्रसारित केले आहे. तसेच ‘बेदरकार स्टंटबाजीला आळा! मोटार स्कुटीवर स्टंट करताना नियम मोडणाऱ्या युवकावर मुंब्रा पोलिसांकडून तात्काळ कारवाई’ असे म्हटले आहे. त्या तरुणाविरोधात पोलिसांनी ई-चलानद्वारे देखील कारवाई केली आहे.
