ठाणे : खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. पण, ठाण्यातील कोलशेत भागातील खाडीत एका तरुणाने कार नेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. याठिकाणी फेरफटका मारत असलेल्या एका रहिवाशाने हा प्रकार पाहून पाण्यात उडी घेऊन त्या तरुणाचे प्राण वाचविले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने खाडीच्या पाण्यात बुडालेली कार क्रेनच्या सहाय्याने ओढून बाहेर काढली.
हेही वाचा >>> साथीचे आजार नियंत्रणासाठी कल्याण-डोंबिवलीत तीन लाख घरांचे सर्वेक्षण, १२ लाख रहिवाशांची आरोग्य तपासणी
यश बिसवास (२५ ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो बाळकुम येथील हायलँड हॅवन टॉवरमध्ये राहतो. कोलशेत खाडीकिनारी परिसरात गणेश विसर्जन घाट आहे. येथे यश हा मंगळवारी सायंकाळी कार घेऊन आला. त्याने आत्महत्या करण्यासाठी गणेश विसर्जन घाट येथून कार खाडीत नेली. याठिकाणी कोलशेत भागात राहणारे मनदीप शिल्पकार हे फेरफटका मारत होते. त्यांनी हा प्रकार पाहून खाडीत उडी घेतली आणि पोहत जाऊन यश याला खाडीतून सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांचे पथक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत यशला दुखापत झालेली नाही. तसेच खाडीच्या पाण्यात बुडालेली कार क्रेनच्या सहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आली असून ती कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. कार व व्यक्ती यांना बाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.