ठाणे: फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज आणि होणारे वायु प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून गावागावांमध्ये फटाक्यांचा वापर कमी व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेने नेमलेल्या पर्यावरण दूतांच्या माध्यमातून यासाठी जनजागृतीचे प्रयत्न केले जात असून माहिती फलकांमार्फतही जनजागृती केली जात आहे.
पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वायू, जल, आकाश, पृथ्वी आणि अग्नी या पंचमहाभूतांचा समतोल राखणे गरजेचे आहे. या पंचतत्त्वानुसार पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी राज्य शासनामार्फत जिल्हा स्तरावर माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर विविध उपाय-योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकारांना दिली. काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. या उत्सवात मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.
हेही वाचा… ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार सानुग्रह अनुदान द्या; कामगार संघटनेची पालिका प्रशासनाकडे मागणी
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमध्ये आधीच प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातही फटाक्यांचा वापर वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात शहरालगतची काही गावे प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात असा अनुभव आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषित होत असते. या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असते.
विशेष मोहीम
यंदा फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामध्ये माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ४३१ ग्रामपंचायतींमध्ये फटाक्यांचा वापर कमी करण्याबात आवाहन केले जात आहे. गावागावातील नागरिकांना याबाबत माहिती मिळावी यासाठी पर्यावरणाशी निगडित काम करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक तसेच पर्यावरण दूतांकडून गावात जनजागृती केली जाणार आहे.
दिवाळी सण हा रोषणाईचा सण असतो. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण फटाक्यांचा वापर कमी करुन जास्तीत जास्त दिवे लावून पर्यावरणपुरक साजरा करुया असे आवाहन ग्रामस्थांमध्ये करण्यात येत आहे. – प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ठाणे जिल्हा परिषद
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
फटाक्यांची मोठ्याप्रमाणात आतषबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे आपल्या पर्यावरणास धोका निर्माण होत असतो. यासाठी कायद्याच्याअंतर्ग आखून दिलेल्या नियमानुसार दिवाळी सण साजरा करावा आणि पर्यावरणाचा समतोल राखावा असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामस्थांना करण्यात येत आहे. – मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद