‘गिरिप्रेमी’च्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी नुकतीच ‘माऊंट हनुमान तिब्बा’ मोहीम केली. या पर्वताचे शिखर सर करण्यात या गिर्यारोहकांना जरी अपयश आले असले तरी त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा जिगर लावत केलेल्या चढाईचे  गिर्यारोहण विश्वात कौतुक केले जात आहे.

‘एव्हरेस्ट २०१२ आणि ‘एव्हरेस्ट ल्होत्से २०१३’ या मोहिमांच्या विक्रमी यशानंतर ‘गिरिप्रेमी’ ने नवोदित गिर्यारोहकांसाठी ‘माऊंट हनुमान तिब्बा’ ही मोहीम आखली होती. या मोहिमेसाठी विशाल कडूसकरच्या नेतृत्वाखाली किरण साळस्तेकर, डॉ. राहुल वारंगे, भूषण शेठ, अक्षय पत्के, मयूर मानकामे, उष:प्रभा पागे आणि मी असा आमचा आठ जणांचा संघ होता. उष:प्रभा पागे या बेस कॅम्प मॅनेजर म्हणून काम पाहणार होत्या. वयाच्या ७० व्या वर्षीही त्यांचा उत्साह आजच्या कंप्युटराईज्ड तरुणाईला लाजवेल असा होता.
‘माऊंट हनुमान तिब्बा’ हे शिखर हिमाचल प्रदेशातील मनाली शहरानजीक असून त्याची उंची १९,७५३ फूट इतकी आहे. धौलदार रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणूनही त्याची ख्याती आहे. १६ जून रोजी आम्ही पुण्याहून मोहिमेसाठी रवाना झालो. १८ जून रोजी मनालीत पोचलो. अतिउंचीवरील हवामानाशी समरस होण्यासाठी मनालीच्या जवळ असणाऱ्या ‘तिलगन’ या ठिकाणी सुमारे २००० फुटांचे ‘हाईट गेनिंग’ करून आलो. दुसऱ्या दिवशी आवश्यक ती खरेदी करून २१ जून रोजी हिडिंबा मातेचे दर्शन घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने मोहिमेस सुरुवात केली. मनाली ते धुंदी हे अंतर जीपने कापून धुंदीपासून चालण्यास सुरुवात केली. पश्चिमेला लख्ख सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या हनुमान तिब्ब्याने दर्शन दिले. शिखराची उत्तर आणि नैर्ऋत्य धार येथून स्पष्ट दिसत होती. शिखराची नैऋत्य धार प्रियदर्शनी, सेव्हन सिस्टर्स या शिखरांना कवेत घेत, धरमशालेच्या दिशेने सरकते. या धारेलाच ‘धौलादार पर्वतरांग’ म्हणतात. तर, शिखराची उत्तर धार, टेंदू पास लडाखी, मांऊंटक्षितीधार, माऊंट फ्रेंडशिप या शिखरांना कवेत घेत पुढे सरकते. शिखराच्या माथ्यापाशी नैर्ऋत्य धारेच्या बाजूने कॉर्निस तयार झालेले होते. टेंदू पास या ठिकाणी धौलादार आणि पीरपंजाल या पर्वतरांगा एकत्र येतात. टेंदू पास हेच आमच्या मोहिमेतील क्रक्स म्हणजेच सर्वात कठीण आव्हान होते. या पासच्या घळीत क्लायम्बिंग करताना आम्हाला रॉकफॉलचा सामना करावा लागणार होता.
धुंदीवरून सुमारे १५ पोर्टर, १ कूक, १ हेल्पर, दोन हॅप सह आमच्या आठ जणांच्या संघाने बीयास कुंड या आमच्या बेसच्या दिशेने कूच केले. धुंदीहून सुमारे ४ तास चालत जाऊन आम्ही बीयास कुंड गाठले. उंची ११,००० फूट. बीयास कुंड हे अतिशय पवित्र ठिकाण असून, येथून बीयास नदीचा उगम होतो.
बीयास कुंड येथे बेस कॅम्प लावल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पच्या दिशेने लोड फेऱ्या सुरू केल्या. या लोडफेऱ्यांना हनुमान तिब्ब्याच्या पूर्व बाजूवरून होणाऱ्या ‘रॉकफॉलचे’ पाश्र्वसंगीत लाभले होते. क्षणाक्षणाला होणारा रॉकफॉल बघून मनात धडकी भरत होती. लोडफेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही बेसकॅम्प वरून अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पला शिफ्ट झालो. ‘अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्प’नंतर ‘कॅम्प १’ च्या दिशेने चढाई सुरू केली.
ही चढाई टेंदू पासच्या मुख्य घळीतून आणि ६० अंश कोनातील खडी चढाई होती. त्यातच वरून होणारा रॉकफॉल आमची कसोटी पाहत होता. टेंदूच्या मुखाशी तर ही चढाई ७० अंश ते ७५ अंश कोनातून होती आणि घळही अरुंद होती. त्यातच ‘वॉच आऊट’ असा कॉल आमच्या ‘हॅप’ने  (हाय अल्डिटय़ूड पोर्टर) दिला. पाहतो तर काय, वरून एक दगड थेट आमच्या दिशेने येत होता. आमचा नेता विशाल कडूसकरच्या दिशेने तो वेगाने सरकला, विशालकडे हालचाल करण्यासाठी वेळही नव्हता. जागीच उभे राहून तो उजव्या बाजूला वाकला. विशाल थोडक्यात बचावला. एक दोन इंचावरून त्याच्या कानाच्या बाजूने तो दगड गेला. त्यामुळे टेंदूची उर्वरित चढाई आम्ही अतिशय वेगाने केली आणि टेंदूच्या माथ्यावर आम्ही पोहोचलो. उंची होती १७,००० फूट. येथून थोडे पुढे आम्ही कॅम्प-१ लावला. ‘कॅम्प-१’ ते ‘समीट कॅम्प’ हा मार्ग म्हणजे संपूर्ण शिखराला घातलेली प्रदक्षिणा आणि संपूर्णपणे हिमाच्छादित असणारा. कॅम्प-१ ते समीट कॅम्प हे अंतर कापण्यासाठी आम्हाला आठ तास लागले. खराब हवामानामुळे मुंबईच्या ‘गिरिविहार’ च्या सदस्यांना माघारी फिरावे लागले. त्यांचा संघ आम्हाला वाटेत भेटला.
आम्ही समीट कॅम्प लावला. त्या वेळी हवामान ढगाळ होते. व्हाईट आऊट झालेला होता. पण दोन तासांनी हवामान सुधारले आणि आमच्या टेंटच्या मागेच असणाऱ्या हनुमान तिब्ब्याचे सुरेख दर्शन झाले. शिखराच्या त्या विहंगम दृश्याने सारा थकवा दूर झाला. एक वेगळाच उत्साह आमच्यात संचारला. त्याच रात्री पहाटे ३ वा. आम्ही अंतिम चढाईसाठी प्रयत्न सुरू केले. दोन तासानंतर समीटच्या खाली असणाऱ्या घळीत आम्ही पोहोचलो. पूर्वेकडे तांबड फुटलं होतं. वर हनुमान तिब्ब्याचा माथा सोन्यासारखा झळाळून निघाला होता. समीट गली पार करून आम्ही मुख्य धारेवर आलो. तेथून दिसणारं कॉर्निसचं दर्शन अत्यंत भेदक होतं. ही कॉर्निस जर तुटली तर थेट ८,००० फुटांचा फॉल होता. या कॉर्निसच्या समांतर बाजूने सावधानतापूर्वक आमचे मार्गक्रमण चालू होते. आमच्याकडील ‘जीपीएस’ हे उपकरण १८,८४० फूट इ. उंची दाखवत होते. शिखरमाथा दिसू लागला, तसा आमच्या चालण्यातला वेग वाढला. येथून समीट फक्त २०० मी. वर होतं, पण..
आमच्या समांतर असणाऱ्या कॉर्निसला पुढे तडा गेलेला होता. आणि त्याहून चालणं सर्वार्थाने धोकादायक होतं म्हणून आमच्या हॅपने पुढे जाण्यास नकार दिला. त्याचवेळी वातावरणही खराब व्हायला लागले होते. आम्ही सर्व जण पहिल्यांदाच मोहिमेवर आलो होतो. त्यामुळे जिवावर बेतणारं धाडस करून पुढे जाणे हे धोकादायक होतं; म्हणून आम्ही सर्वानुमते मागे फिरण्याचा निर्णय घेतला. आमचे यश थोडक्यात हुकले. जड अंत:करणाने आम्ही पुन्हा बेस कॅम्प गाठला. बरीच चर्चा केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शिखर चढाईसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. सहसा हिमालयात सेकंड अटेम्प्ट कोणी घेत नाही. परंतु आम्ही हा निर्णय घेतला. पुन्हा शून्यातून सुरूवात करावी लागणार होती. त्या वेळी अक्षय पत्के, विशाल कडूसकर आणि मी असे तिघे क्लायम्बिंग करणार होतो. केवळ दोनच दिवस आम्ही बेसकॅम्पला थांबून मोहिमेवर पुन्हा एकदा रवाना झालो. आमचा हा सेकंड अटेम्प्ट ‘अल्पाईन स्टाईल’ ने होणार होता. यामध्ये आम्ही लोडफेऱ्या न करता, प्रत्येक दिवशी कॅम्प शिफ्ट करत जाणार होतो. ४ जुलै रोजी आम्ही बेस कॅम्पवरून कॅम्प १ च्या दिशेने निघालो. मोहिमेच्या या टप्प्यावर आमचा नेता विशाल कडूसकरने खांदा दुखू लागल्यामुळे मागे फिरण्याचा निर्णय घेतला. हा आमच्यासाठी मोठा धक्का होता.
कॅम्प १ नंतर पुन्हा एकदा टेंदूचे खडतर आव्हान पार करून आम्ही कॅम्प २ लावला. पुढच्याच दिवशी आम्ही समीट कॅम्पपर्यंत पोहोचलो. सारं काही आलबेल होतं. आमचा हा ‘सेकंड अटेम्प्ट’ आमची शारीरिक क्षमता पाहणारा तर होताच, पण त्याहीपेक्षा अधिक आमची मानसिक कसोटी पाहणारा होता. रात्री २ वा. आम्ही समीटच्या दिशेने चढाई सुरू केली. समीटची गली पार करून वर आलो; पुन्हा एकदा शिखरमाथा दृष्टिक्षेपात आला. आता समीट होणारच असा विश्वास वाटू लागला, पण नियतीला ते मान्य नव्हते. वातावरणातील बदलांमुळे समीट रीजपाशी स्नो कंडिशन संपूर्णपणे बदलल्या होत्या. त्याठिकाणी आइस आम्हाला लागला. आइसमध्ये ठोकायचे विशिष्ट खिळे असतात, ते कमी पडले. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही मागे फिरण्याचा निर्णय घेतला.
शरीराने आणि मनाने आम्ही खंबीर होतो. परंतु निसर्गापुढे हतबल होतो. निसर्गापुढे पर्वतांपुढे आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव निसर्गाने आम्हाला करून दिली. या खेळात शिखर सर करणे महत्त्वाचे असतेच, पण त्याहीपेक्षा पर्वतांमधून सुरक्षितरीत्या घरी पोचणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. ‘अपयश येऊनसुद्धा यश साजरे करता येणे’ हे फक्त याच खेळात जमते. कारण या ठिकाणी कोणीही स्पर्धक नसतो. तुमची स्पर्धा ही स्वत:शीच स्वत:च्या शारीरिक, मानसिक क्षमतेशी असते आणि हिमालयातून गिर्यारोहण करून आल्यानंतर आमची ही क्षमता नक्कीच उंचावलेली होती. म्हणूनच हनुमान तिब्बा या शिखराशी आम्ही दिलेली ही दुहेरी झुंज आमच्यासाठी यशस्वी झालेली होती.