राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे जंगल वसलेले आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवीसन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. देशातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये रणथंबोर किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावरूनच या जंगलाला रणथंबोर राष्ट्रीय उद्यान असे नाव मिळाले. हे जंगल आणि किल्ला भटकंतीचे १४ ते २० मार्च दरम्यान निसर्ग टूर्सच्या वतीने आयोजन केले आहे. तसेच या सहलीला जोडून जयपूर शहराचीही भटकंती केली जाणार आहे. यामध्ये जयपूरमधील ऐतिहासिक इमारती, जंतर-मंतर वेधशाळा, सिटी पॅलेस, अंबर फोर्ट आदी स्थळांना भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
सिक्कीम भटकंती
ईशान्य भारतातील सिक्कीम पर्यटनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असले तरी पर्यटकांचा ओघ असतो मुख्यत: प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडेच. पण सिक्कीमचा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, विलोभनीय निसर्गाच्या थेट जवळ जायचे असेल तर नेहमीची पर्यटनस्थळे सोडून वेगळी वाट शोधावी लागते. म्हणूनच ‘यूथ होस्टेल’च्या महाराष्ट्र राज्य शाखेने एक आगळीवेगळी मोहीम २०१५ पासून सुरू केली होती. एप्रिल २०१६ मध्येदेखील अशीच मोहीम आखण्यात आली आहे. १४ दिवसांच्या या मोहिमेत चार दिवस सिक्कीममधील किटाम आणि टिंगवाँग या ग्रामीण भागात भटकंती करता येणार आहे. किटाम हे सिक्कीममधील एकमेव पक्षी अभयारण्य असलेले गाव नेपाळ सीमेवर वसलेले आहे. तर टिंगवाँग हे कांचनजुंगा शिखराच्या परिसरात आहे. या दोन्ही गावांतील घरांमध्येच राहण्याची आणि जेवणाची सुविधा असल्यामुळे सिक्कीमच्या ग्रामीण जीवनाचा थेट अनुभव घेता येणार आहे. सिक्कीमचे ग्रामीण आदरातिथ्य, ग्रामीण जीवन, गावकऱ्यांबरोबर संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, आजूबाजूंच्या डोंगरात-जंगलात भटकंती अशी ही अनोखी मोहीम असणार आहे. या वर्षी या मोहिमेचा विस्तार करून सिक्कीमबरोबरच भूतानचादेखील समावेश करण्यात आला आहे. १४, १६ आणि १८ एप्रिल २०१६ मध्ये या तीन गटांमध्ये आपण हा ग्रामीण पर्यटनाचा अनुभव घेऊ शकता. प्रवेश मर्यादित अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२२४१२ ६००४.