करोना व्हायरस या महामारीनं जगाला ग्रासलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वच देशात कसोशीनं प्रयत्न केले जात आहे. यावर उपाय म्हणून अनेक देशांनी लॉकडाउन घेतला आहे. डॉक्टर, नर्स आपला जीव धोक्यात घालून रूग्णांना वाचवण्यासाठी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. जीवावर उदार होऊन रूग्णांवर उपाचार करणाऱ्या क्टरांचा अमेरिकेत अनोख्या पद्धतीनं सन्मान केला आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या उमा मधूसूदन यांचा अमेरिकेतील स्थानिकांना गाड्यांचे हॉर्न वाजवत सन्मान केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उमा मधूसूदन या मूळच्या मैसूर येथील असून सध्या साउथ विंडसर इथं राहतात. उमा मधूसूदन यांनी आतापर्यंत २०० रूग्णांना करोनाच्या कचाट्यातून वाचवलं आहे. त्यांनी केलेल्या या अभुतपुर्व कामाबद्दल स्थानिकांनी तब्बल १०० गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचं आभार मानलं आहे. मधू यांच्या घरासमोरून या गाड्या हॉर्न, सायरन वाजवत जात असून…त्या गाड्यांमध्ये उमा यांनी उपचार केलेले लोक आहेत. सर्वांनी हातात उमा यांचे आभार मानणारे पोस्टर्स धरले आहेत.

उमा यांच्या घरासमोरून जाताना प्रत्येक गाडी हॉर्न वाजवून उमा यांचा सन्मान करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तसेच तिथंच पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्यांनीही सायरन वाजवला. डॉक्टर उमा यांनी घराच्या समोर उभा राहून सर्वांचे हे प्रेम स्वीकारले.

जगभरात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे एक लाख ७५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपाल जीन गमावावा लागला आहे. आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून करोना रूग्णांना वाचवत आहेत. करोनाबाधित ६ लाखांपेक्षा जास्त रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहे. सध्या अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांची सख्या आठ लाखांपेक्षा जास्त असून ४५ हजारांहून आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.