जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतामध्ये करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दोन हजारांच्या आसपास गेली आहे. करोना व्हायरसची महामारी रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वांच्या कानी करोना आणि लॉकडाऊन हेच शब्द पडत आहेत. त्याचा परिणाम नवजात बाळाच्या नामकरणावरही झाल्याचे दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील दोन कुटुंबांनी चक्क बाळांची नावं करोना आणि लॉकडाऊन अशी ठेवली आहेत.

२२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यादिवशी उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये एका मुलीचा जन्म झाला होता. त्यामुलीचे नाव करोना ठेवलं आहे. नुकताच देवरिया जिल्ह्यात एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नामकरण कुटूंबीयांनी लॉकडाऊन असे केले आहे.

करोना व्हायसरच्या वाढत्या फैलावामुळे देशात ऐक्‍याची भावना आणखी दृढ झाली आहे. करोना या महामारीला रोखण्यासाठी उचलण्यात आलेली लॉकडाऊनसारखी पाऊले योग्यच आहेत. त्यामुळे जनतेला खबरदारी घेण्याची आठवण करून देण्याच्या उद्देशातून आम्ही बाळांची नावे ठेवल्याचे कुटुंबांनी म्हटले.

छत्तीसगढमध्ये जुळ्यांची नावं करोना आणि कोविड

छत्तीसडच्या रायपूरमध्ये २७ मार्च रोजी एक महिलेनं जुळ्यांना जन्म दिला. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी त्यांची नावे “कोविड आणि कोरोना,” अशी ठेवली आहेत. लोकांच्या मनातील या महामारीची भीती दूर करण्यासाठी या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या मुलांची नावेच कोवीड आणि कोरोना, अशी ठेवली आहेत.