ट्विटरवर नेहमीच सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर चपला शिवणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. आपल्या छोट्याशा व्यवसायाची त्यानं केलेली जाहिरात पाहून आनंद महिंद्रा प्रभावित झाले होते. त्याची डोकॅलिटी त्यांना इतकी आवडली की ‘इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मनेजमेंट’मध्ये हा व्यक्ती कदाचित मार्केटिंग विषय शिकवत असावा असं ट्विट करत आनंद महिंद्रांनी त्याचं कौतुक केलं होतं.

‘हे जखमी चप्पलाचं रुग्णालय असून येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘जखमी’ चपलांवर जर्मन पद्धतीनं उपचार केले जातील.’ अशी हटके जाहिरातबाजी त्यानं केली होती. इतकंच नाही तर स्वत:च्या नावापुढे त्यानं ‘डॉक्टर’ पदवीही लावली होती. त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरातबाजी करण्याची त्याची कला पाहून महिंद्राही प्रभावीत झाले होते. ‘या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाली तर मला सांगा. त्यांच्या व्यवसायात मला पैसे गुंतवायला आवडतील’ असंही ट्विट त्यांनी केलं होतं. अखेर दोन आठवड्यानंतर त्यांना या व्यक्तीचा पत्ता सापडला आहे.

हरियाणामधल्या आनंद महिंद्रा यांच्या टीमनं नरसीजी यांचा पत्ता शोधून काढला. ‘जेव्हा आपले काही सहकारी नरसीजींना भेटले आणि त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा प्रामाणिकपणे त्यांनी आर्थिक मदत नाकारली’, अशी माहिती महिंद्रा यांनी ट्विट करून दिली. ‘आर्थिक मदतीपेक्षा मला व्यवसायासाठी योग्य ती जागा असेल तर द्या’ इतकी विनंती त्यांनी केली. ‘मुंबईतील आमच्या स्टुडिओ डिझाईन टीमनं नरसीजींची भेट घेतली आहे. थोड्याशा जागेत त्यांच्यासाठी छानसं दुकान आम्ही बांधून देत आहोत. यासाठी काही डिझाईन्स तयार केल्या आहेत त्यानुसार बांधणी लवकरच पूर्ण होईल’ अशी माहिती ट्विटद्वारे आनंद महिंद्रा यांनी दिली आहे.

व्हॉट्स अॅपवरून नरसीजींचा फोटो आनंद महिंद्रापर्यंत पोहोचला होता. काही दिवसांत त्यांनी नरसीजींचा शोध घेऊन त्यांना मदत केल्याबद्दल त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. गेल्यावर्षी एका व्यक्तीनं महिंद्रा अँड महिंद्राच्या स्कॉर्पिओ गाडीसारखा लूक आपल्या रिक्षाला दिला होता. हा फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. रिक्षाचालकाची ही कल्पना महिंद्रा यांना एवढी आवडली होती की त्यांनी ही रिक्षा विकत घेऊन ती प्रदर्शनात ठेवली होती.