ट्विटरवर नेहमीच सक्रीय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आनंद महिंद्रा यांनी चपला शिवणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. या व्यक्तीनं आपल्या छोट्याशा व्यवसायाची केलेली जाहिरात पाहून आनंद महिंद्रा प्रभावित झाले आहेत. त्याची डोकॅलिटी त्यांना इतकी आवडली की ‘इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मनेजमेंट’मध्ये हा व्यक्ती कदाचित मार्केटिंग विषय शिकवत असावा असं ट्विट त्यांनी केलं आहे.

वाचा : ‘त्यांना’ फाशी देण्यासाठी जल्लाद होण्यासही तयार, आनंद महिंद्रांची संतप्त प्रतिक्रिया

‘हे जखमी चप्पलाचं रुग्णालय असून येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘जखमी’ चपलांवर जर्मन पद्धतीनं उपचार केले जातील.’ अशी हटके जाहिरातबाजी त्यानं केली होती. इतकंच नाही तर स्वत:च्या नावापुढे त्यानं ‘डॉक्टर’ पदवीही लावली होती. त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरातबाजी करण्याची त्याची कला पाहून महिंद्राही प्रभावीत झाले. हा फोटो त्यांना व्हॉट्स अॅपवर आला होता. जर या व्यक्तीबद्दल कोणतीही माहीती मिळाली तर मला सांगा त्यांच्या व्यवसायात मला पैसे गुंतवायला आवडतील असंही ट्विट त्यांनी केलं आहे.

आनंद महिंद्रा हे अनेकदा वेगवेगळ्या कल्पना लढवून काहीतरी नवं करणाऱ्या अनेक व्यक्तींचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून त्यांचं कौतुक करतात. गेल्यावर्षी एका व्यक्तीनं महिंद्रा अँड महिंद्राच्या स्कॉर्पिओ गाडीसारखा लूक आपल्या रिक्षाला दिला होता. हा फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचला. रिक्षाचालकाची ही कल्पना महिंद्रा यांना एवढी आवडली होती की त्यांनी ही रिक्षा विकत घेऊन ती प्रदर्शनात ठेवली होती.