भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली घोषणा केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे भारतीयांनी निराशा व्यक्त केली असतानाच महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनाही ट्विटवरुन या निर्णयासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

सोमवारी मध्यरात्री चांद्रयान-२ च्या प्रक्षेपण रद्द करण्यात आल्यानंतर ट्विटरबरोबरच अनेक समाज माध्यमांवर यासंदर्भात प्रतिक्रियांचा पाऊस पडला. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं मात्र शेवटच्या क्षणी त्याचे प्रक्षेपण थांबवण्यात आले. घाई करुन वाईट वाटून घेण्याऐवजी सुरक्षित अन् उशीरा गेलेलं बरं अशा अर्थाचं ट्विट महिंद्रा यांनी केले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘वाईट वाटून घेण्याऐवजी सुरक्षा अधिक महत्वाची आहे. हे काम ज्यांच्या हाती आहे ती टीम सक्षम आणि प्रोफेश्नल असून त्यांना या प्रेक्षेपणात सर्वाधिक धोका कधी आहे त्यांना ठाऊक आहे. दुसऱ्या एखाद्या दिवशी यशस्वी प्रेक्षेपण होणार असेल तर तात्पुरते मागे हटावे लागल्यास हरकत नाही. मी पुन्हा जागा राहिलं हे प्रेक्षेपण पहायला.’

महिंद्रा यांच्या या ट्विटवर आलेली एक प्रतिक्रियाही त्यांनी रिट्वीट केली आहे. या प्रतिक्रियेमध्ये आनंद परमेश्वरन या व्यक्तीने महिंद्रा यांच्या मताशी सहमती दर्शवत ‘चेर्नोबिल’ येथील अपघाताची आठवण करुन दिली. ‘चेर्नोबिलच्या वेळेसही त्यांची टीम अशाच संकटात सापडली होती. दिलेल्या दिवशी चाचण्या केल्या नसत्या तर चेर्नोबिल दुर्घटना झाली नसती. त्यांच्याकडे पर्याय होता पण त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळेच सुरक्षित आणि निश्चित असेल तेव्हाच प्रेक्षेपण केलेलं बरं,’ असं या ट्विटमध्ये परमेश्वरन यांनी म्हटले आहे. हे ट्विट आनंद महिंद्रांनी आपल्या अकाऊंटवरुन रिट्वीट केले आहे.

चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.