मिस वर्ल्ड या स्पर्धेला असणारे महत्त्व आणि त्याची व्याप्ती याचा विचार करता त्यासाठी पात्र होणे ही खऱ्या अर्थाने कसोटीच म्हणावी लागेल. जागतिक स्तरावरील या स्पर्धेचा मुकुट भारतीय कन्येच्या डोक्यावर येणे ही तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या स्पर्धेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचे मानुषीने दिलेले उत्तर तिला हा मान मिळण्यास कारणीभूत ठरले असे म्हणावे लागेल.

चीनमधील सान्या येथे मिस वर्ल्ड २०१७ ही स्पर्धा रंगली. जगभरातून आलेल्या १३० सौंदर्यवतींमध्ये रंगली होती. सुरूवातीच्या फेऱ्यांनंतर मानुषी अंतिम पाच स्पर्धकांमध्ये पोहोचली. अवघ्या २१ वर्षांच्या मानुषीला परीक्षकांनी एक प्रश्न विचारला आणि त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून केवळ परीक्षकच नाही तर उपस्थितही भारावून गेले. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या उत्तराबाबत सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.

ती म्हणाली, माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा. हा किताब पटकावल्यानंतर तिने टि्वट करून सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सर्वांचे धन्यवाद. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं,’ असं सांगत तिने हा पुरस्कार भारताला अर्पण केला आहे.

यापूर्वी भारताच्या रिटा फारीया, प्रियांका चोप्रा, युक्ता मुखी, डायना हेडन आणि ऐश्वर्या राय यांनी ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.